HinduismNews

सार्वजनिक गणेशोत्सव – अर्थकारणाचा उत्सव

सध्या सार्वजनिक गणेशोत्सवावरून खूप चर्चा सुरू आहे. कोणाला त्यातला गोंगाट खटकतो, कोणाला प्रतिस्पर्धा,कोणाला खर्च आणि कोणाला आधुनिकतेच्या नावाखाली होणारा सांस्कृतिक ह्रास.हा प्रत्येकाचा त्याचा दृष्टिकोण आहे. पण एक गोष्ट आपण विसरतो, की हा उत्सव आता फक्त महाराष्ट्रापुरता राहिला नाही तर.हा सण आता देशभरातल्या हिंदू कुटुंबात आपलासा झाला आहे. आणि हा फक्त धार्मिक सोहळा नाही, तर लाखो लोकांच्या उपजीविकेचा स्त्रोत आहे.

लोकमान्य टिळकांनी १८९३ साली जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, तेव्हा त्यामागे दोन विचार होते – स्वदेशीचा वापर आणि लोकांनी एकत्र येणं.स्वदेशी उत्पादनांच्या प्रसारासाठी झाली. स्थानिक कारागीर, सुतार, शिंपी आणि विणकरांना एकत्र आणून स्थानिक व्यापाराला प्रोत्साहन देणे हा यामागचा मुख्य हेतू होता.जेणेकरून आर्थिक स्वावलंबन मिळावं हाच त्यामागचा हेतू होता. आज १३० वर्षांनी तोच विचार खरा ठरतोय.

विचार करा, गणेशोत्सवाच्या दहा दिवसात किती मोठी आर्थिक उलाढाल होते. मूर्ती, मंडप, लाईट, फुलं, मोदक, कपडे… कोट्यवधी रुपये बाजारात फिरतात.एका मूर्तिकाराला त्याचा अख्ख्या वर्षाचा संसार या एका सणावर चालतो. लाईट-साऊंडवाला, मंडप बांधणारा मजूर, ढोल-ताशा पथकातली मुलं – या सगळ्यांना या दिवसांत खरा रोजगार मिळतो. आपल्या आजूबाजूचे जास्वंद, झेंडू, दुर्वा विकणारे फुलवाले, केळीची पानं,भाज्या आणणारा शेतकरी, घरी बसून उकडीचे मोदक करून विकणारी गृहिणी… त्यांच्या हातात चार पैसे याच काळात येतात. नऊवारी, सोवळं, कुर्ता शिवणारा आपलाच विणकर पुन्हा कामाला लागतो.

आता तर बदलही छान होतोय. लोक शाडूच्या मातीची, शेणाची मूर्ती मागू लागलेत. प्लास्टिक, थर्माकोल नको, कापड आणि बांबूची सजावट हवी, असं म्हणू लागलेत. यातून नवीन पर्यावरणपूरक उद्योजक तयार होतायत.पर्यटनातूनही मोठे आर्थिक योगदान मिळते.गणपतीसाठी गावी जाणाऱ्या एसटी, रेल्वे, प्रायव्हेट ट्रॅव्हल्स, हॉटेल्स – सगळ्यांची कमाई होते. लालबागचा राजा,दगडूशेठसारख्या मोठ्या मंडळाचे दर्शन घेण्यास येणाऱ्या गर्दीमुळे कितीतरी लोकांना काम मिळतं.आज तर छोट्यातला छोटा व्यवसाय करणारा सुद्धा QR कोड लावून व्यवसाय करतोय, यामुळे डिजिटल अर्थव्यवस्था भक्कम होतेय. पण याची दुसरी बाजूही आहे, जी मान्य करायलाच हवी.

कधी कधी वाटतं, उत्सवाचा बाजार झालाय. भक्तीपेक्षा स्पर्धा जास्त दिसते. कोणाचा देखावा मोठा, कोणाची जाहिरात मोठी. काही ठिकाणी वर्गणीची सक्ती,राजकारणी हस्तक्षेप,पैशाची उधळपट्टी… हे कुठेतरी थांबायला हवं.म्हणूनच समतोल गरजेचा आहे. उत्सव मोठ्या दिमाखात कराच, पण त्यात आपली संस्कृती, आपलं पर्यावरण आणि अर्थकारण यांचा विचार करणं गरजेचं आहे . ढोल-ताशा, भजन, लोककला हे जपलं पाहिजे. रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी असे सामाजिक उपक्रम मंडळांनी जास्त केले पाहिजेत.सद्यस्थितीतील बदल घडवणे ही पुढच्या पिढीची जवाबदारी आहे.त्यासाठी सकारात्मक बदल व्हायला हवे.

गणेशोत्सव केवळ सण नाही तर तो हजारो लहान व्यापारी, कारागीर आणि कष्टकऱ्यांच्या उपजीविकेचा भक्कम आधार आहे.सार्वजनिक गणेशोत्सवाचे खरे यश केवळ भव्यतेत नाही, तर त्यातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी आणि समृद्ध होणाऱ्या स्थानिक अर्थव्यवस्थेत आहे.लोकमान्य टिळकांच्या या स्वदेशी,सामाजिक एकतेच्या आणि आर्थिक स्वावलंबन या संकल्पनेला आधुनिक, पर्यावरणपूरक आणि सुजाण विचारांची जोड देणे आवश्यक आहे.शेवटी काय, गणपती बाप्पा फक्त विघ्नहर्ता नाही, तर तो हजारो हातांना काम देणारा, घर चालवणारा आधार आहे. टिळकांनी पाहिलेलं स्वदेशी आणि एकतेचं स्वप्न आपण असंच पुढे नेऊया, थोडं आधुनिक आणि पर्यावरणपूरक बनून.

लेखिका :- बागेश्री देशपांडे..

Back to top button