महिलांनी आपली आंतरिक शक्ती ओळखून तिचा समाजहितासाठी उपयोग करावा – वंदनीय प्रमुख संचालिका मा. शांताक्का जी
राष्ट्र सेविका समिति – विजयादशमी उत्सव
नागपूर : महिलांनी आपली आंतरिक शक्ती ओळखून तिचा समाजाच्या कल्याणासाठी उपयोग करावा. तसेच, तरुणांच्या विचारांत आणि आचरणात सकारात्मक परिवर्तन घडवून, भारतीय जीवनमूल्यांच्या आधारावर त्यांना विश्वकल्याणाचे वाहक बनविण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राष्ट्र सेविका समितिच्या वंदनीय प्रमुख संचालिका मा. शांताक्का जी यांनी केले. राष्ट्र सेविका समिति, नागपूर महानगराच्या वतीने आयोजित शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सवाच्या प्रसंगी त्या बोलत होत्या.
पुढे बोलताना त्यांनी आगामी दशकात समितीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कार्याची दिशा स्पष्ट केली. ज्या प्रकारे सात्त्विक आहार शरीराला निरोगी ठेवतो, त्याचप्रमाणे श्रेष्ठ विचार मन आणि बुद्धीला संस्कारित करतात. शाखांच्या माध्यमातून चारित्र्यसंपन्न आणि राष्ट्रनिष्ठ नागरिकांची निर्मिती होते, असे त्यांनी सांगितले.
समाजात भ्रम पसरवून आणि तरुण पिढीला दिशाभूल करून भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विघातक व विषारी विचारसरणीच्या तथाकथित बौद्धिक नक्षलवादी प्रवृत्तींपासून सावध राहण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नागपूर येथील महात्मा गांधी सेंटेनियल स्कूलमध्ये आयोजित या कार्यक्रमाला लक्ष्य फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा प्रभुदेसाई प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. आपल्या ओजस्वी भाषणात त्या म्हणाल्या, “मुल हे एक अक्षर असेल, तर आई हा कवितासंग्रह आहे आणि सैनिकाची आई तर महाकाव्य आहे.”
राष्ट्र सेविका समितिच्या सेविकांनी सादर केलेली प्रात्यक्षिके पाहून प्रभावित झालेल्या श्रीमती अनुराधा प्रभुदेसाई यांनी या युवती भविष्यात समाजाला नेतृत्व प्रदान करतील, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वंदनीय प्रमुख संचालिका मा. शांताक्काजी आणि प्रमुख अतिथी श्रीमती अनुराधा प्रभुदेसाई यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, यंदाच्या विजयादशमीच्या दिवशी राष्ट्र सेविका समिति आपल्या स्थापनेच्या ९०व्या वर्षात पदार्पण करीत आहे.
या कार्यक्रमात सेविकांनी योगासने, डम्बेल्स, तालयोग, दंड, गोफ, व्यायामयोग आणि घोष यांची प्रभावी प्रात्यक्षिके सादर केली. सेविकांच्या शिस्तबद्ध सादरीकरणातून त्यांचे शारीरिक कौशल्य, सामूहिकता, आत्मविश्वास आणि संघभावना यांचे दर्शन घडले.
या प्रसंगी राष्ट्र सेविका समितिच्या अखिल भारतीय सहकार्यवाहिका मा. चित्राताई जोशी यांच्यासह अन्य अखिल भारतीय व क्षेत्रीय अधिकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच समाजातील अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते.
संपूर्ण वंदे मातरम् गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
