NewsRSS

संघशक्ती : संस्कारांतून राष्ट्रनिर्माण

हे वर्ष संघशताब्दीचे आहे. या राष्ट्रातील हिंदूंच्या संघटनेचे युगानुकूल स्वरूप प्रकट व्हावे, यासाठी भूतकाळातील इतिहासाचा मागोवा घेत आणि समाजाचे संघटन व्हावे, या उद्देशाने संघ गेली शंभर वर्षे कार्यरत आहे. संघाची स्थापना होताना एक परमवैभवशाली हिंदू राष्ट्र पुन्हा उभे राहावे, हा संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या मनातील स्पष्ट विचार होता.

एखादे राष्ट्र समर्थ तेव्हाच असते, जेव्हा त्या राष्ट्राच्या समाजजीवनात चारित्र्याचे संस्कार खोलवर रुजलेले असतात. भारतात पूर्वी समाजजीवनातील हे संस्कार मंदिर, गुरुकुल आणि कुटुंब या माध्यमांतून होत होते. या राष्ट्रावर अनेक परकीय आक्रमणे झाल्यानंतरही संस्कार देणारी ही तिन्ही केंद्रे आज पुरेशा क्षमतेने संस्कार करू शकत नाहीत, असे चित्र दिसते. परकीय आक्रमणांच्या सुरुवातीला मंदिरांची झालेली पडझड, १८व्या शतकात येथील गुरुकुलांची झालेली वाताहत आणि सध्याच्या काळात कुटुंबसंस्थेतून होणाऱ्या संस्कारांकडे झालेले दुर्लक्ष, अशी आजची स्थिती दिसते. ही संस्कार देणारी केंद्रे पुन्हा त्याच क्षमतेने कार्य करू शकतील, यासाठी संघशाखा हे एक उत्तम माध्यम आहे, याची संघशताब्दी वर्षानिमित्त प्रकर्षाने जाणीव होते.

संघशाखेतून स्वयंसेवकांचा व्यक्तिविकास आणि अशा सामूहिक व्यक्तिविकासातून निर्माण होणाऱ्या शक्तीच्या माध्यमातून राष्ट्राचे सक्षमीकरण, या प्रक्रियेतून अनेक स्वयंसेवक घडले. आपल्या तन-मन-धनपूर्वक व्यवहाराने त्यांनी राष्ट्राच्या अनेक अंगोपांगांना स्पर्श केला. सेवा, समरसता आणि स्वबोध यांचे महत्त्व ओळखून त्यानुसार कार्यपद्धती विकसित केल्या आणि राष्ट्रात पुन्हा एकदा नवचैतन्य जागृत केले.

आज भारतीय कुटुंबसंस्थेकडे विशेषतः लक्ष देण्याची आवश्यकता असताना, संघशाखेतून संस्कारित झालेली मंडळी कुटुंब प्रबोधनाच्या कार्यात गतीने कार्यरत असलेली दिसतात. संघशाखेतून मिळालेले दोन महत्त्वाचे संस्कार या कार्यात सहाय्यभूत ठरतात. ते म्हणजे कार्याप्रती असलेला समर्पणभाव आणि कर्तव्यभाव. हे दोन्ही भाव व्यक्तिविकासाचे आधार असले, तरी कुटुंबभाव सुदृढ राहायचा असेल, तर प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रथम हेच भाव रुजण्याची आवश्यकता आहे.

संघशाखेच्या कार्यपद्धतीत विविध कार्यक्रमांची योजना असते. उदाहरणार्थ, शाखेत खेळ, समता, बौद्धिक आणि चर्चा हे कार्यक्रम असतातच. यासोबतच अनुशासन अर्थात स्वयंशिस्त अंगी बाणण्यासाठी बैठक, नैपुण्य वर्ग, एकत्रीकरण, सांघिक कार्यक्रम आणि शिबिरे यांचेही आयोजन केले जाते. अशा नियमित कार्यक्रमांतून परस्पर स्नेह, लोकसंग्रही व्यक्तिमत्त्व, व्यक्तीपेक्षा तत्त्वनिष्ठेला प्राधान्य आणि व्यवहारातील शुद्धतेचा आग्रह अशा कितीतरी गुणांचा विकास संघशाखेतून होतो. दैनंदिन शाखेच्या कार्यक्रमांप्रमाणेच नैमित्तिक कार्यक्रमही आयोजित केले जातात. उदाहरणार्थ, वार्षिकोत्सव, पथसंचलन, विविध श्रेणींच्या बैठका आणि बौद्धिक वर्ग इत्यादी. या सर्व उपक्रमांतून स्वयंसेवकांमध्ये व्यवस्थाकौशल्य, निर्णयक्षमता आणि गुणांची वृद्धी सहज घडून येते.

समाजावर आणि राष्ट्रावर आलेल्या अनेक कठीण प्रसंगांत, संकटकाळात अथवा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी स्वयंसेवक स्वतःहून पुढे येऊन कार्यरत राहतात. संघशाखेतून प्राप्त झालेले गुण स्वयंसेवकांच्या माध्यमातून अशा वेळी सक्रिय होतात. त्या वेळी एक व्यापक नित्यसिद्ध शक्ती कार्यरत असते, याचा सर्वांनाच अनुभव येतो. आपले संपूर्ण जीवन राष्ट्रजीवनासाठी समर्पित करणारी प्रचारक यंत्रणा अशा कार्यात अग्रेसर असते. सक्षम राष्ट्राच्या उभारणीच्या प्रक्रियेत या सर्वांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. समाजजीवनातही याचा प्रत्यय यावा, यासाठी येणाऱ्या काळात स्वयंसेवकांनी संघशाखांच्या विस्ताराकडे लक्ष दिले पाहिजे. त्याचबरोबर समाजातील सज्जनशक्तीला जोडून, प्रसंगी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल केली पाहिजे. वर्तमान परिस्थितीत याची नितांत गरज आहे.

लेखक : मनोज मसुरकर
(कुटुंब प्रबोधन गतिविधी, कोकण प्रांत संच सदस्य)

Back to top button