NewsSpecial Day

संविधान रक्षति रक्षितः..

‘धर्मो रक्षति रक्षितः’ हे विश्व हिंदू परिषदेचे ब्रीदवाक्य आहे. त्याचा अर्थ होतो, जो धर्माचे रक्षण करील, त्याचे रक्षण धर्म करतो. धर्म याचा अर्थ ‘धारणात् धर्म इत्याहुः धर्मो धारयति प्रजाः’ अशी धर्माची व्याख्या केली जाते. त्याचा अर्थ होतो, समाजाची धारणा करणारे शाश्वत सनातन नियम म्हणजे धर्म, ग्रंथ पठण, व्रत वैकल्ये, तीर्थयात्रा, विविध देवतांची पूजा, हा धर्माचा आचार विभाग झाला. तो व्यक्तीपरत्वे वेगवेगळा असतो. त्यात एकसारखेपणा नसणे हे आपले वैशिष्ट्ये आहे.

धर्मरक्षण याचा अर्थ धर्माच्या शाश्वत नियमांचे रक्षण आणि पालन. धर्माचे नियम जगावे लागतात. आपल्या धर्माचा पहिला नियम सर्वकाही ब्रह्म आहे, हा आहे. त्याचा अर्थ होतो की, आपण जे जे काही डोळ्यांनी पाहतो, तो सर्व एका तत्त्वाचा पसारा आहे. चेतन-अचेतन, सर्व वस्तूजात, धर्माचा पसारा आहे. दुसरे तत्त्व मी ज्या ब्रह्माचा अंश आहे आणि तिसरे तत्त्व तूदेखील त्या ब्रह्माचा अंश आहेस. हा सर्व तत्त्वविचार समाजाची धारणा करतो. यासाठी तो जगावा लागतो.

आपले संविधान हादेखील समाजाची धारणा करणारा ग्रंथ आहे. त्यामुळे तो वर दिलेल्या अर्थाने धर्मग्रंथदेखील आहे. शाश्वत धर्म आचरणात आणावा लागतो, तसा संविधानधर्मदेखील आचरणात आणावा लागतो. तो जगावा लागतो. म्हणून ‘धर्मो रक्षति रक्षितः’ हे जितके खरे आहे तेवढेच खरे ‘संविधान रक्षति रक्षितः’ हेदेखील खरे आहे.

संविधानाच्या धर्माला राजधर्म म्हणतात. त्याला दंडनिती असेदेखील म्हणतात. हे दोन्ही शब्द भारतीय आहेत. धारणा करणार्‍या धर्माचे असंख्य उपविभाग होतात. उदाः- कुलधर्म, व्यक्तीधर्म, समाजधर्म, पत्नीधर्म, पतीधर्म, शिष्यधर्म, इत्यादी इत्यादी. या सर्व ठिकाणी धर्माचा अर्थ कर्तव्याचे आचरण असा होतो. उदाः- व्यक्तीधर्म म्हणजे व्यक्ती अनेक नात्यांनी जगत असतो. आणि प्रत्येक नातेसंबंधाची कर्तव्ये असतात. ती पार पाडावी लागतात.

आपले संविधान हे राजधर्माचे संहिताकरण आहे. त्याला देशाचा सर्वोच्च कायदा म्हणतात हा कायदा समाजाला बांधून ठेवतो, तसा राज्यकर्त्यांनाही बांधून ठेवतो. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, आणि न्यायपालिका ही तीन राज्यशासनाची अंगे असतात. त्यांची संवैधानिक कर्तव्ये कोणती, हे संविधानाचा कायदा सांगतो. या कायद्याचे उल्लंघन कोणालाही करता येत नाही.

संविधान हे नागरिकांची कर्तव्येही सांगते. आपल्या संविधानाने समानतेचे, स्वातंत्र्याचे, आणि उपासना स्वातंत्र्याचे अधिकार दिलेले आहेत. हे अधिकार सर्व नागरिकांना समान आहेत. अधिकार आणि कर्तव्ये दोन्ही छाया-प्रकाश या न्यायाने एकत्र चालतात. कर्तव्याशिवायच्या अधिकाराला काहीही अर्थ नसतो. जसा धर्म जगावा लागतो तसे संविधानाची ही सर्व कलमे व्यक्तीला आणि समूहाला जगावी लागतात.

आपले संविधान धर्माच्या पुढील शाश्वत सिद्धांतावर उभे आहे. यातील पहिला सिद्धांत समाज हा न्यायाच्या तत्त्वावर उभा करण्यात येईल. आपले संविधान त्यासाठी तीन शब्दांचा उपयोग करते. 1) सामाजिक न्याय, 2) आर्थिक न्याय, 3) राजकीय न्याय. सामाजिक न्यायाची कलमे हे सांगतात की, कायद्यापुढे समानता असेल, सर्वांना कायद्याचे संरक्षण असेल, जाती-भाषा-पंथ आणि लिंगभेद स्वीकारला जाणार नाही. दुर्बळांना सक्षम केले जाईल. संधी समानता असेल.

आर्थिक न्यायाची कलमे हे सांगतात की, सर्वांना सन्मानाने जगता येईल अशी अर्थव्यवस्था उभी केली जाईल. एकाच प्रकारच्या कामासाठी स्त्री-पुरूषांना समान वेतन राहील. मागासवर्गीयांसाठी विशेष तरतूदी केल्या जातील. राजकीय न्यायात हे सांगितले आहे की, सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार राहील. निवडणुकांसाठी कुणीही उभं राहू शकतं. राजकीय संघटन उभं करू शकतं. शांततामय मार्गाने सभा, मिरवणुका काढू शकतात.

दुसरा सिद्धांत आपल्याला एक राष्ट्र बनवायचे आहे. एक राष्ट्र बनण्यासाठी जातीभेद मिटले पाहिजेत, अस्पृश्यता संपली पाहिजे, सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे, आणि राष्ट्र जीवनात सर्वांची सहभागिता वाढली पाहिजे. आपल्या संवधिानाची विविध कलमे हा भाग कायद्याच्या भाषेत सांगतात.

तिसरे मूलभूत तत्त्व आहे. व्यक्तीच्या जिवीताचे संरक्षण आणि व्यक्तीची प्रतिष्ठा व गरिमा हे आहे. जुलमी राज्यसत्तेत व्यक्तीच्या जीवनाची सुरक्षा नसते. व्यक्तीला प्रतिष्ठादेखील नसते. हुकूमशाही, राजेशाही, घरणेशाही, या राजवटी व्यक्ती विकासाला मारक असतात. आपले संविधान हे सांगत की, कायद्याने ठरविलेली प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कुणालाही अटक करता येणार नाही, तुरूंगात पाठविता येणार नाही, त्याची संपत्ती जप्त करता येणार नाही, आणि त्याचा जीव घेता येणार नाही.

आपल्या संविधानाचे चौथे मूलभूत तत्त्व प्रजातंत्राचे आहे. प्रजातांत्रिक राजवट ही आपल्या राज्यघटनेने आपल्याला दिलेली आहे. प्रजातांत्रिक राजवटीत प्रजा सार्वभौम असते. म्हणजे प्रजेकडे सर्व सत्ता असते. आपले राज्यकर्ते कोण असतील, हे प्रजा ठरविते. लोकांनी, लोकांकरवी, लोकांसाठी, जे राज्य चालविले जाते, त्याला लोकशाही म्हणतात किंवा प्रजातंत्र म्हणतात, असे हे आपले प्रजातंत्र आहे.

या सर्व विषयांचा परामर्श विश्व हिंदू परिषदेच्या 22 जानेवारीच्या अभ्यासवर्गात घेण्यात आला. ही परिषद ऐतिहासिक परिषद होती. लेखाच्या सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे ‘धर्मो रक्षति रक्षितः’ हे विश्व हिंदू परिषदेचे ब्रीदवाक्य आहे. विश्व हिंदू परिषद हे ब्रीदवाक्य जगत असते. धर्माच्या व्यापक संकल्पनेत राजधर्मदेखील येतो. हा राजधर्म संविधानातून व्यक्त होतो. म्हणून ‘संविधान रक्षति रक्षितः’ हेदेखील विश्व हिंदू परिषदेचे स्वभाविक काम होत असते. कार्यकर्त्यांना त्याची जाणीव करून देणारा हा वर्ग, यासाठी ऐतिहासिक वर्ग ठरतो.

लेखक:- रमेश पतंगे..

Back to top button