‘भारत’ हे केवळ एक नाव नसून आपली ओळख आहे – जनरल अनिल चौहान (निवृत्त)
छत्रपती संभाजीनगर, २५ नोव्हेंबर २०२६.
छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पाचव्या ‘पद्म फेस्टिवल’मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, “विकसित भारताची उभारणी करायची असेल, तर त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. देशात राष्ट्रहितासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणारे असंख्य लोक आहेत. त्यामुळेच देश वेगाने प्रगती करत आहे. २०४७ मधील समर्थ भारत जगाला दिशा देणारा असेल. भारत दुर्बलांना आपल्या अधीन ठेवण्यासाठी शक्तीशाली बनणार नाही, तर त्यांचा रक्षणकर्ता बनेल ”.
या प्रसंगी व्यासपीठावर निवृत्त सीडीएस जनरल अनिल चौहान, पद्म महोत्सवाचे अध्यक्ष मिलिंद केळकर, स्वागताध्यक्ष उन्मेश टाकळकर आणि मंगला केंडे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून दोन दिवसीय पद्म महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
पाचव्या पद्म महोत्सवाच्या दोन दिवसीय कार्यक्रमाला निवृत्त एअर मार्शल पद्मा बंदोपाध्याय, रमेश पतंगे, डॉ. शुभा व्ही. अय्यंगार, डॉ. बी. एन. गंगाधर, देवेंद्र झाझरिया, भिकल्या लाडक्या धिंडा, श्रीरंग (दादा) लाड, पद्मजा फेणाजी जोगळेकर, डॉ. एन. राजम, फैसल अली डार, चामी मुर्मू आणि जार्देन लेपचा यांच्यासह पद्म पुरस्काराने सन्मानित झालेल्या अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
डॉ. मोहन भागवत म्हणाले, “कोणताही चांगला बदल घडवायचा असेल, तर आत्मविश्वास असणे आवश्यक आहे. हा आत्मविश्वास उदाहरणांतून मिळतो. एखाद्या व्यक्तीच्या प्रयत्नांतून लगेच परिवर्तन दिसून येत नाही; मात्र सामूहिक प्रयत्नांतून परिवर्तन घडवणे शक्य होते. आपल्या महापुरुषांनीही हेच करून दाखवले आहे. त्यांनी परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून केली.
संघाचा स्वयंसेवक समाजातील दुःख आणि समस्या पाहतो, तेव्हा त्यांच्या निराकरणासाठी केवळ विचार करत बसत नाही, तर प्रत्यक्ष कार्याला सुरुवात करतो. त्यानंतर समाजाकडूनही त्याला आपोआप सहकार्य मिळू लागते. देशात चुकीची कामे करणाऱ्यांच्या तुलनेत कितीतरी पटींनी अधिक लोक निःस्वार्थ भावनेने चांगल्या उद्देशाने कार्य करत आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. देशभरातील प्रवासात आम्हाला याचा अनुभव येतो. त्यामुळे चांगले कार्य करणाऱ्या लोकांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या कार्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहणे योग्य नाही. अशी सवय असेल, तर ती सोडली पाहिजे.”
‘भारत’ केवळ एक नाव नाही, तर आपली ओळख आहे – जनरल अनिल चौहान
निवृत्त जनरल अनिल चौहान म्हणाले, “आज ‘भारत’ या शब्दाचा वापर सर्वत्र अभिमानाने होत आहे. पूर्वी भारताकडे जुन्या संदर्भांतून पाहिले जात होते, मात्र आज जगाला नव्या भारताचे स्वरूप दिसत आहे. भारत हीच आपली ओळख आहे. ‘भारत’ हा शब्द आपली परंपरा, संस्कृती आणि सामायिक इतिहास अधोरेखित करतो. २०४७ पर्यंत विकसित, सशक्त आणि सक्षम भारत घडवण्यासाठी आपल्याला कार्य करायचे आहे . आपल्याकडे युवा शक्ती आहे आणि तिच्यावर मोठी जबाबदारी आहे. बाह्य धोक्यांपेक्षा अंतर्गत धोके अधिक गंभीर असतात. त्यामुळे आपण सदैव सतर्क राहिले पाहिजे. आभासी माध्यमांतून भारतीय एकता आणि अखंडता भंग करण्याचे प्रयत्न होत आहेत. जेव्हा जेव्हा आपला समाज आपापसांतील वादांमुळे विभागला गेला, तेव्हा तेव्हा परकीय आक्रमणे झाली आणि आपल्याला पारतंत्र्याचा सामना करावा लागला, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे आपली एकता आणि अखंडता हीच आपली सर्वांत मोठी शक्ती आहे.”
