NewsRSS

संघाच्या कार्यपद्धतीचा मूलाधार समाजाप्रती आपलेपणा आणि निःस्वार्थ सेवा – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

संघ स्वयंसेवकांची तपश्चर्या गेल्या शंभर वर्षांपासून सुरू असून पुढेही ती अशीच सुरू राहील –सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

१५-२० स्वयंसेवकांपासून सुरू झालेला संघ आज जगातील सर्वांत मोठी संघटना – न्यायमूर्ती जगदीश सिंह खेहर

नवी दिल्ली, २९ नोव्हेंबर २०२६ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, दिल्ली प्रांताच्या वतीने रविवारी रोहिणी सेक्टर २३ येथील ‘समरसता स्थळा’वर ‘राष्ट्र वंदनम्’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्वयंसेवक आणि समाजातील सज्जनशक्ती यांचा संगम या कार्यक्रमातून घडून आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत जी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती जगदीश सिंह खेहर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दिल्ली प्रांत संघचालक डॉ. अनिल कुमार अग्रवाल यांनी आभार मानले. सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, सहसरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल आणि अरुण कुमार यांच्यासह संघाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

गणवेशातील स्वयंसेवक तसेच समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, प्रबुद्ध नागरिक आणि मातृशक्तीला संबोधित करताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले की, संघाचे शताब्दी वर्ष हा केवळ उत्सव नसून राष्ट्रनिर्माणाच्या नव्या संकल्पाचा शंखनाद आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभर वर्षांची वाटचाल ही केवळ एका संघटनेच्या विकासाची कथा नाही. ती राष्ट्राप्रती समर्पण, त्याग, अनुशासन आणि अखंड साधनेची गाथा आहे. शताब्दी वर्ष हे केवळ उत्सव साजरा करण्याचे किंवा आतापर्यंतच्या कार्याचे गुणगान करण्याचे वर्ष नव्हते. समाजाशी संपर्क, संवाद आणि सहभाग वाढवून राष्ट्रनिर्माणाच्या कार्याला नवी गती देण्याचा हा संकल्प होता.

ते म्हणाले की, संघ स्वयंसेवकांची तपश्चर्या गेल्या शंभर वर्षांपासून सुरू आहे. शताब्दी वर्षातील कार्यक्रम संपल्यानंतरही त्यांची तपश्चर्या सुरूच आहे आणि पुढेही ती सुरू राहील. याच ध्येयाने ते संघाचे स्वयंसेवक झाले आहेत. शताब्दी वर्षानिमित्त देशभरात उत्साहाने विविध कार्यक्रम झाले. मात्र, संघाने आपल्या तपश्चर्येला उत्सवाचे स्वरूप दिले नाही. या वर्षाचा उपयोग समाजाशी संपर्क आणि संवाद वाढवण्यासाठी, अधिकाधिक लोकांपर्यंत संघाचे विचार पोहोचवण्यासाठी आणि प्रत्यक्ष कार्याचा विस्तार करण्यासाठी करण्यात आला. हिंदू संमेलने, सद्भावना बैठका आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाचा व्यापक सहभाग वाढवण्यात आला.

सध्याच्या काळात देशातील विशेषतः तरुण पिढीमध्ये भारताला जगातील अग्रगण्य राष्ट्र म्हणून पाहण्याची तीव्र आकांक्षा दिसून येते. तरुणांमध्ये सामर्थ्य, पराक्रम आणि पुरुषार्थाची भावना आहे. त्यांना योग्य ध्येय, स्पष्ट दिशा आणि सकारात्मक मार्गदर्शन देण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रहित सर्वोच्च मानण्याची भावना समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा आधार बनली पाहिजे. जात, भाषा, प्रांत, मत-पंथ अशा भेदांच्या पलीकडे जाऊन संपूर्ण समाजाने आपण एक राष्ट्र आहोत, ही भावना अनुभवली पाहिजे.

भारताची खरी शक्ती विविधतेतील एकात्मता, परस्पर सद्भाव आणि आपलेपणाच्या भावनेत आहे, असे सांगून डॉ. भागवत म्हणाले की, प्रत्येकाने दुसऱ्याला आपले मानावे आणि राष्ट्राचे सुख-दुःख हे आपलेच सुख-दुःख आहे, अशी भावना समाजात निर्माण झाली पाहिजे. राष्ट्रीय पुनर्निर्माणाचा आधार हीच भावना असेल.

जगात भारताविषयीचा आदर आणि अपेक्षा दोन्ही वाढत आहेत. भारताची सांस्कृतिक दृष्टी, सहअस्तित्वाची परंपरा, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण आणि व्यक्ती व समाजाप्रती असलेल्या कर्तव्यांचा समतोल या गोष्टी संपूर्ण जगाला प्रेरणा देऊ शकतात. भारताने केवळ आर्थिक आणि सामरिक शक्ती म्हणून नव्हे, तर संपूर्ण जगाला सुख, शांती आणि संतुलित जीवनाचा मार्ग दाखवणारे राष्ट्र म्हणून पुढे आले पाहिजे.

भारत, हिंदुत्व आणि संघ यांच्याविषयी विपरीत प्रचार करणारे अनेक लोक आहेत आणि हा प्रचार कोणत्याही अडथळ्याविना सुरू आहे. लोकांसमोर एकच बाजू मांडली जात आहे; दुसरी बाजू त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे संघाची भूमिका आणि प्रत्यक्ष कार्य लोकांपर्यंत जाऊन सांगितले पाहिजे. याच उद्देशाने संघाच्या कार्यकर्त्यांचे परदेशातही प्रवास झाले, असे त्यांनी सांगितले.

संघाच्या कार्यपद्धतीचा मूलाधार समाजाप्रती आपलेपणा आणि निःस्वार्थ सेवा हा आहे. कोणत्याही वैयक्तिक लाभाची, प्रशंसेची किंवा परतफेडीची अपेक्षा न ठेवता स्वयंसेवक अनेक दशकांपासून राष्ट्र आणि समाजासाठी समर्पित भावनेने कार्य करत आहेत. समाजाचे दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न करणे, हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय आहे, असे डॉ. भागवत यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, आपला देश म्हणजे काय, याची एक अस्पष्ट का होईना, पण सर्वत्र समान अशी कल्पना आहे. आपल्या देशाची अस्मिता काय आहे, आपल्या देशाचे स्वरूप काय आहे आणि आपल्या देशाचे अंतःकरण नेमके कशात आहे, याचा विचार लोक करतात. लोक आपल्या समाजजीवनाचा आणि राष्ट्रजीवनाचा विचार वेदपूर्व काळापासून आजपर्यंतच्या प्रवासाच्या संदर्भात करतात. महात्मा गांधी यांनीही हिंदुत्व म्हणजे सत्याचा निरंतर शोध, असे म्हटले होते. या सत्यशोधनाच्या तपश्चर्येत हिंदू समाज थकला आहे आणि त्यामुळे आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, हा समाज आपला थकवा दूर करून पुन्हा जागा होईल. त्यानंतर तो अधिक सामर्थ्याने आणि तेजस्वीपणे जगात आपली नियोजित भूमिका पार पाडेल. आज समाजात जागृतीपूर्वीची एक नवी उभारी दिसू लागली आहे.

शताब्दी वर्षानंतर संघासमोरचे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे समाजातील सज्जनशक्तीला एका व्यापक राष्ट्रीय अभियानाशी जोडणे, असे त्यांनी सांगितले. संघाचे ध्येय केवळ शाखांचा विस्तार करणे किंवा स्वयंसेवकांची संख्या वाढवणे एवढेच नाही. संपूर्ण समाजात राष्ट्रहित सर्वोच्च मानण्याची जाणीव निर्माण करणे हे त्यामागचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक नागरिक आपल्या कर्तव्यांविषयी जागरूक असावा, नागरी शिस्त पाळावी, सामाजिक संवेदनशीलता जपावी आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी सक्रिय योगदान द्यावे, असा समाज घडवायचा आहे.

स्वयंसेवकांनी आपली तपश्चर्या, साधना आणि समर्पणाची भावना अखंड जपावी, असे आवाहन त्यांनी केले. स्वतःचे व्यक्तिमत्त्व आणि चारित्र्य अधिक उन्नत करावे, समाजाशी सातत्याने संपर्क व संवाद ठेवावा आणि सद्भावना, सामाजिक समरसता व राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ करावी. समाजातील सर्व सात्त्विक आणि सकारात्मक शक्तींना सोबत घेऊन राष्ट्रपुनर्निर्माणाच्या कार्याला गती द्यावी.

संघाचे कार्य हे केवळ एका संघटनेचे किंवा स्वयंसेवकांचे कार्य नाही, तर संपूर्ण राष्ट्राचे आणि समाजाचे कार्य आहे. समाजातील प्रबुद्ध नागरिक, तरुण, मातृशक्ती आणि विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या सज्जन व्यक्तींनी केवळ पाठिंबा आणि शुभेच्छा देण्यापुरते मर्यादित न राहता राष्ट्राच्या नवउत्थानाच्या या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा. प्रत्येक कुटुंबातील किमान एका तरुणाने राष्ट्रनिर्माणाच्या या कार्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. आपले ध्येय स्पष्ट आहे. संघटित, समरस, स्वावलंबी, सद्गुणसंपन्न आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण समाजाची निर्मिती करणे, हेच आपले उद्दिष्ट आहे. या समाजाच्या सामर्थ्याच्या बळावर भारताने पुन्हा एकदा जगात आपले गौरवपूर्ण स्थान प्राप्त करावे आणि संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचा, सुखशांतीचा मार्ग प्रशस्त करावा, असे ते म्हणाले.

संघाच्या शताब्दी वर्षाचा संदेश हाच आहे की, ही तपश्चर्या थांबणार नाही, समाजाशी संपर्क थांबणार नाही आणि राष्ट्रनिर्माणाचा संकल्पही दुर्बल होणार नाही. समाजातील प्रत्येक सकारात्मक शक्तीला सोबत घेऊन भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी संघटित प्रयत्नांना आता नवी गती द्यायची आहे.


संघाच्या सेवाकार्याचा गौरव

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती जगदीश सिंह खेहर यांनी संघाच्या सेवा यात्रेचा विशेष उल्लेख केला. देशाची फाळणी आणि १९८४ मधील शीखविरोधी हत्याकांडाच्या काळात स्वयंसेवकांनी केलेल्या मदतकार्याची त्यांनी आठवण करून दिली. समाजाप्रती सेवाभाव आणि सहकार्याची भावना महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीबद्दल शुभेच्छा देताना ते म्हणाले, “संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो. एकेकाळी केवळ १५ ते २० तरुणांपासून सुरू झालेली ही संघटना आज कदाचित जगातील सर्वांत मोठी संघटना बनली आहे, हे पाहून मला आनंद आणि अभिमान वाटतो.”
लेखी इतिहासावरून असे दिसून येते की, संकटाच्या काळात स्वयंसेवक नेहमीच मदतीसाठी सर्वांत आधी पुढे आले आहेत. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीच्या वेळी पंजाबमध्ये स्वयंसेवकांनी आत्मसंरक्षणाची व्यवस्था करणे, मदत पोहोचवणे तसेच हिंदू आणि शीख बांधवांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवणे यांसारखी महत्त्वपूर्ण कामे केली.

१९६२ मध्ये चीनच्या आक्रमणानंतर स्वयंसेवकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून भारतीय सैन्य आणि नागरी प्रशासनाला मदत केली. आघाडीच्या ठिकाणांच्या मागील भागांत नागरिकांपर्यंत आवश्यक वस्तू, इंधन आणि अन्य साहित्य पोहोचवण्याचे काम त्यांनी केले.

समाजाच्या सामूहिक शक्तीचे जागरण

‘राष्ट्र वंदनम्’ हा कार्यक्रम केवळ संघटनात्मक आयोजनापुरता मर्यादित राहिला नाही, तर राष्ट्रजीवनात समाजाची सामूहिक शक्ती, सहभाग आणि कर्तव्यभावना व्यक्त करणारा सोहळा ठरला. संघाच्या शताब्दी वर्षातील या महत्त्वाच्या टप्प्यावर राजधानी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात सुमारे ९ हजार स्वयंसेवकांनी सामूहिक आसनांची शिस्तबद्ध प्रात्यक्षिके सादर केली. यातून त्यांची शिस्त, शारीरिक क्षमता आणि राष्ट्रभक्तीचे दर्शन घडले. सुमारे ७०० घोषवादकांनी संघघोषाच्या सुमधुर आणि प्रभावी सादरीकरणातून वातावरण राष्ट्रभावनेने भारून टाकले.

समरसता स्थळावर भरवण्यात आलेल्या विशेष प्रदर्शनातून भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, विविधता, सामाजिक जीवन आणि राष्ट्रीय एकात्मतेचे विविध पैलू मांडण्यात आले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रबुद्ध नागरिक, कुटुंबे आणि तरुणांनी या प्रदर्शनाला भेट दिली.

लोकसहभागातून साकारले तीन संकल्प

‘राष्ट्र वंदनम्’ कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे समाजपरिवर्तनासाठी घेतलेले तीन महत्त्वाचे संकल्प लोकसहभागातून पुढे नेण्यात आले.

  • पहिला संकल्प शून्य कचरा (झिरो वेस्ट) अभियानाचा आहे. याअंतर्गत दिल्लीतील १९ वसाहतींमध्ये कचरा व्यवस्थापन आणि कचऱ्याचे प्रमाण कमीत कमी करण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे.
  • दुसरा संकल्प ड्रग फ्री सोसायटी अर्थात व्यसन मुक्त समाजाचा आहे. तरुणांना व्यसनांच्या दुष्परिणामांची जाणीव करून देणे आणि त्यांना योग्य दिशा देणे, हा या अभियानाचा उद्देश आहे. स्वयंसेवकांनी सामाजिक संघटना आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने आतापर्यंत १५ हजारांहून अधिक तरुणांपर्यंत पोहोचून या कार्याला सुरुवात केली आहे.
  • तिसरा संकल्प पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा आहे. कार्यक्रमस्थळाच्या आसपास तीन ते चार किलोमीटरच्या परिसरात ५० हजार वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांत यापैकी सुमारे ४५ हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे.

समाजाच्या सक्रिय सहभागातून सकारात्मक आणि कायमस्वरूपी परिवर्तन घडवण्याच्या दिशेने उचललेली ही ठोस पावले आहेत.

तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नियोजन आणि व्यवस्था

दिल्ली प्रांतातील संघाच्या सुमारे २,४०० शाखांच्या माध्यमातून नोंदणीसाठी ‘अविरल’ ॲपचा वापर करण्यात आला. कार्यक्रमस्थळी प्रवेशाची व्यवस्था सुरळीत आणि शिस्तबद्ध राहावी, यासाठी आठ प्रमुख प्रवेशद्वारे उभारण्यात आली होती. सुरक्षेच्या आणि समन्वयाच्या दृष्टीने प्रत्येक प्रवेशद्वारावर क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतरच प्रवेश देण्यात येत होता. दिल्ली प्रांतातील संघकार्याच्या आठ विभागांनुसार या प्रवेशद्वारांना वेगवेगळे रंग देण्यात आले होते. वाहनांनी येणाऱ्या सहभागींसाठी परिसरात पुरेशी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली होती.

‘राष्ट्र वंदनम्’चा संदेश

समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन राष्ट्राचा सर्वांगीण विकास, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, स्वावलंबन आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक व्यापक करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कटिबद्ध आहे. ‘राष्ट्र वंदनम्’ हा याच संकल्पाचा सार्वजनिक आविष्कार आहे. संघटनेच्या मर्यादेपलीकडे जाऊन संपूर्ण समाजाच्या सामूहिक शक्तीला राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सहभागी करून घेण्याची प्रेरणा या कार्यक्रमातून मिळते.

समाज संघटित, सुसंस्कारित आणि आत्मनिर्भर करण्यासाठी सुरू असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमधील हा एक नवा अध्याय आहे. स्वयंसेवक आणि समाजातील जागरूक नागरिक एकत्र येऊन पर्यावरण संरक्षण, नशामुक्त समाज आणि स्वच्छतेसाठी ठोस काम करतील, हीच या कार्यक्रमाची सर्वांत मोठी फलश्रुती आहे.

Back to top button