“अवघा रंग एक झाला”.. या विशेष मालिकेतून आपण समाजाला समरस करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या संतांबद्दल आपण जाणून घेणार आहोत…
पांडुरंगाच्या भक्तीत रममाण होणाऱ्या संत जनाबाई..
परलोकीचे तारू। म्हणे माझा ज्ञानेश्वर।, असे संत माऊलींचे गुणगान करणाऱ्या वारकरी संप्रदायातील महत्त्वाची संत कवयित्री म्हणजे संत जनाबाई. संत जनाबाईंनी विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ असे त्या म्हणत असत.
‘विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा।।’ हा सुप्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे. त्यांना संत नामदेवांमुळे संत-संग घडला होता.घरातील कामे करत असताना अखंड नामस्मरण करणे जनाबाईंचा दिनक्रम असे.श्री संत ज्ञानदेव-विसोबा खेचर-संत नामदेव-संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे.
संत जनाबाईंच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनांतून रेखाटल्या आहेत. संत नामदेवांवरील भक्ति-प्रेमभाव, संत ज्ञानदेवांविषयी असलेला उत्कट भाव, संत चोखोबांच्या भावसामर्थ्याचे अनुसरण, तसेच विठ्ठलाविषयीचा अनन्य भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतप्रोत भरलेला दिसून येतो.त्या वेळप्रसंगी देवाशी भांडायला देखील कचरत नसत.
झाडलोट करी जनी । केर भरी चक्रपाणी ।
पाटी घेऊनियां शिरीं । नेऊनियां टाकी दुरी ।
जनी ह्मणे विठोबाला । काय उतराई होऊं तुला ॥
