हिंदू धर्मात अनेक संप्रदाय आहेत. अनेक असूनही सर्वांनी दिलेला संदेश म्हणजे भक्ती होय! या संप्रदायांपैकी एक म्हणजे वारकरी संप्रदाय. विठ्ठल भक्तीची एकतारी वाजवत पायी वारी करण्याचा क्रम अनेक शतकांचा असून, वारकरी संप्रदाय आजही तितक्याच भक्तिभावाने या परंपरेचा वारसा पुढे नेत आहे. ही वारी म्हणजे पांडूरंगाच्या भक्तीचा सोहळाच असतो. यातूनच समरसतेचा अर्थबोध होतो. सर्व संतांनी या वारीची महती वर्णन केली, या वारीच्या मागील सिद्धांतांचा मागोवा घेणारा लेख..
चोखोबाचे सारे घर |
झाले भक्तीचे मंदिर|
उपेक्षिल्या समाजी देवत्व थोर |
देता संस्कार प्रगटे ते ॥
(ग्रामगीता अध्याय – २९)
देवभक्ती हा हिंदू समाजाचा स्वाभाविक गुण. हिंदू घरातील देवघर व प्रत्येक गावातील मंदिर व त्या मंदिरावरील भगवी पताका, ही तर हिंदुस्थानची खरी ओळख. सांस्कृतिक व राष्ट्रीय भावनेचीच ती प्रतीके आहेत. हजारो वर्षांपासून हा वारसा भारताने जपला आहे. वारी १३व्या शतकापूर्वीपासूनच सुरू होती, असे म्हणतात. संत ज्ञानेश्वरांनी आळंदी ते पंढरपूर अशा वारीचा प्रारंभ केला. मध्ययुगीन कालखंडातील ‘भक्ती आंदोलना’ला, यामुळेच प्रचंड बळ मिळाले. गुलामगिरीतून हिंदू समाजात काही दोष निर्माण झाले. स्पृश्य-अस्पृश्य व उच्च-नीचता अशा वाईट रूढीही आल्या. पण, एक गोष्ट जी समाजाला एकत्र करण्यास फार उपयुक्त होती, ती म्हणजे भक्ती. परमेश्वर-भक्तीचा अधिकार सर्वांनाच होता. परमेश्वराशी एकरूप होणे, नामसंकीर्तनात तल्लीन होऊन जाणे, हा तर आवडीचा विषय! संत ज्ञानेश्वर ‘नाथ संप्रदायी’ होते. परंतु, तत्कालीन परिस्थिती लक्षात घेता, समाजाला एकत्र करण्यासाठी सामूहिक परमेश्वर-भक्ती हेच त्यांना योग्य वाटले.
आळंदी ते पंढरपूर वारी प्रारंभ झाली. तेव्हापासूनच या वारीत अठरापगड जातींमधून संत व समाजातील सर्व घटक सहभागी झाले होते. विठ्ठलभक्ती हीच सर्वांची ओळख होती. परमेश्वरभेटीचे विलक्षण आकर्षण काय किमया घडवते याचे उदाहरण म्हणजे, वारी प्रचंड मोठी झाली. माऊली ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज, संत सोपान, संत मुक्ताबाई, संत नामदेव महाराज, संत नरहरी, संत चोखोबा, संत जनाबाई, सोयराबाई, कान्होपात्रा, संत विसोबा खेचर इ. संतमंडळी व स्त्री-पुरुषांचा मोठा जनसमूह पंढरपूरक्षेत्री एकत्र आला. माध्यम होते विठ्ठलभक्ती! देवभक्ती व आपली तीर्थक्षेत्रे, खरोखरच हिंदू समाजाच्या एकात्मतेचा भक्कम आधार आहेत. वारी म्हणजे, १३व्या शतकातील हिंदूंच्या समरसतेचे विराट दर्शन ठरले. पुढे संतांनी पिढी दरपिढी, समाजमनात भजन व प्रबोधनातून देवभक्ती दृढ केली.
रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी|
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा॥
माऊली ज्ञानेश्वरांचा हा अभंग; विठ्ठलाच्या ठायी माधवाच्या रुपाच्या सौंदर्याचे वर्णन करतो.

संत नामदेव महाराज त्यांच्या अभंगात म्हणतात, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा|
भक्तीची ही परंपरा २०व्या शतकातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनापर्यंत कायम राहिलेली दिसते. तुकडोजी महाराज त्यांच्या अभंगात मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे| अशी विनवणी भगवंताच्या चरणी करतात. देवभक्तीचा अधिकार संत चोखोबांनीही वर्णन केला आहे. चोखोबा म्हणतात,
पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग|
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग॥
संतांना निरंतर देवभक्तीनेच देवत्व प्राप्त झाले. परमेश्वरभेटीची आर्तता संत तुकारामांच्या अभंगांतून प्रकट होते,
कन्या सासुरासी जाये | मागे परतुनी पाहे|
तैसे झाले माझ्या जीवा | केव्हा भेटसी केशवा॥
तर, संत कान्होपात्रांच्या हृद्ययातील आर्त भावही अभंगातूनच प्रकट होतात,
नको देवराया अंत आता पाहू|
प्राण हा सर्वथा जाऊ पाहे॥
मध्ययुगीन कालखंडातील संतांच्या ‘भक्ती चळवळी’ने, हिंदू समाजात चेतना निर्माण केली. गुलामगिरीविरुद्ध लढण्यास समाजाला सिद्ध केले. संतांनी समाजाला सोबत घेऊन केलेले, हे राष्ट्ररक्षणाचेच कार्य होते.
दाही-दिशांनी पालखी घेऊन, पंढरपूरसाठी वारकरी पायी मार्गक्रमण करीत निघतात. महत्त्वाच्या केवळ सहा किंवा सातच दिंड्या आहेत. परंतु, आता तर महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांतून शेकडो पालख्या पंढरपुरास येतात. विदर्भातून माता रुक्मिणीची पालखी, कौंडण्यपूरवरून तर प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराजांची पालखी निघते. शेगावची संत गजानन महाराजांची पालखी तर फारच प्रसिद्ध. शेगावी हजारो भक्त पालखीसाठी येतात. वारकरीमंडळींसोबतच तिच्या पुढील मुक्कामापर्यंत जातात. हा सोहळा, हा भक्तांचा उत्साह पाहिल्यानंतर पांडुरंगाने भक्तांचे भावविश्व कसे व्यापले आहे, याची प्रचिती येते. गुरुकुंज येथून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पालखी, तर वर्धा जिल्ह्यातील घोराड येथून संत केजाजी महाराज यांची पायी वारी आजही अखंडपणे सुरू आहे.

संतांनी मनामनांतील देवभक्ती दृढ केली. त्यामुळेच आजही त्यातून भक्तीत समरस झालेल्या समाजाचे दर्शन घडते. ‘देव, देश व धर्माच्या रक्षणासाठी वारी’ हे वाक्य आता रूढ झाले आहे. हिंदू-संस्कृतीचा भगवा हातात घेऊन, लाखो वारकरी पंढरीची वाट चालतात. पांडुरंगही आपल्या भक्तांच्या भेटीसाठी जणू आसुसलेला असतो. हिंदू समाजाच्या ऐक्याचे हे विराट दर्शन, काही स्वघोषित पुरोगामी व विभाजनवादी प्रवृत्तींना पाहावत नाही. याच्या विराट दर्शनाने ते अस्वस्थ होतात आणि मग कुरापती सुरू करतात. ‘सर्वधर्मसमभाव वारी’, ‘संविधान वारी’ असे विभाजन करण्याचे षड्यंत्र सुरू होते. गट-तट उभे करण्याचेही प्रयत्न सुरू होतात. संत साहित्य व प्रबोधनाचा वारसा निरंतर चालवणारी संतमंडळी, ज्यांच्याविषयी वारकरी संप्रदायात व सकल हिंदू समाजात नितांत आदराची भावना आहे; अशा ज्येष्ठ व श्रेष्ठ संतांना ‘घुसखोर’ ठरवणे, हा करोडो विठ्ठलभक्तांचाच अपमान. पुरोगामी आणि नास्तिकांना वारीमध्ये घुसवून, जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे व वारकरी संप्रदायात उभी फूट पाडणे, हेच यामागचे मोठे षड्यंत्र आहे. विशेष म्हणजे वारकरी हे हिंदू नाहीत, असे ठरवण्याचा या हिंदू धर्मविरोधी मंडळींचा खास अजेंडा आहे. तरीही नकारात्मक विचार खूप दिवस चालत नाहीत, हेच आता अनुभवास येत आहे.
विठ्ठलभक्तीत रममाण झालेला वारकरी, तर या नकारात्मकतेकडे फारसा लक्षच देत नाही. वारी म्हणजे शेकडो वर्षांपासूनची अविरत साधना आहे, ही एक तपश्चर्याच आहे. ‘पाऊले चालती पंढरीची वाट…’ या वाटेवर ‘राम कृष्ण हरी’ या मंत्राचा गजर आहे. सामूहिक देवभक्तीतून, आध्यात्मिक अधिष्ठान असलेली समाजशक्ती उभी राहते. सर्व संत याच वाटेवर हरिनामाचा गजर करीत चालत राहिले. त्याच वाटेवरुन आज हिंदू समाज चालत असून, यालाच धर्ममार्ग म्हणतात.
लेखक :- सुभाष लोहे
साभार :- मुंबई तरुण भारत
