
“अवघा रंग एक झाला”.. या विशेष मालिकेतून आपण समाजाला समरस करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या संतांबद्दल आपण जाणून घेणार आहोत…
अखिल विश्वासाठी पसायदान मागणारे माउली ज्ञानेश्वर महाराज
तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मर्म सामान्य जनतेला समजेल अशा रसाळ मराठी भाषेत ‘भावार्थदीपिका’ म्हणजेच ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथाच्या रूपात मांडले. ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यानंतर , जेव्हा त्यांचे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ यांनी त्यांना ग्रंथाची सांगता करताना काहीतरी मागण्यास सांगितले, तेव्हा माउलींनी स्वतःसाठी काहीही न मागता संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी एका अलौकिक प्रसादाची मागणी केली. हेच ते ‘पसायदान’.
‘पसायदान’ म्हणजे केवळ ९ ओव्यांचे काव्य नसून मानवी कल्याणाची वैश्विक प्रार्थना आहे. सामान्यतः माणूस जेव्हा देवाकडे मागतो, तेव्हा तो स्वतःचे घर, कुटुंब इतकाच विचार करतो. परंतु माउलींचे हृदय इतके विशाल होते की त्यांनी “आता विश्वात्मके देवे…” असे म्हणत संपूर्ण विश्वात व्यापून राहिलेल्या चैतन्याला आळवले आहे.
माउलींनी पसायदानात पहिली मागणी केली, “जे खळांची व्यंकटी सांडो | तया सत्कर्मी रती वाढो |”. खळ म्हणजे दुर्जन किंवा दुष्ट प्रवृत्तीचे लोक. माउलींनी दुष्टांचा संहार करण्याची मागणी केली नाही, तर त्यांच्यातील ‘दुष्ट प्रवृत्ती’ नष्ट होऊन त्यांना सत्कर्माची गोडी लागावी, अशी प्रार्थना केली. ही माउलींची करुणा आहे जी गुन्हेगाराचा नव्हे तर गुन्ह्याचा द्वेष करायला शिकवते.
पुढे ते म्हणतात, “भूतां परस्परें जडो | मैत्र जिवांचे ||”. म्हणजेच जगातील सर्व सजीवांमध्ये एकमेकांबद्दल निस्वार्थ मैत्रीची भावना निर्माण व्हावी. आजच्या २१ व्या शतकात, जिथे मानव विज्ञानाच्या जोरावर चंद्रावर पोहोचला आहे, तिथेच दुसरीकडे माणसामाणसांमधील अंतर वाढत चालले आहे. युद्ध, द्वेष, मत्सर आणि दहशतवादाच्या सावटाखाली जगणाऱ्या आजच्या समाजाला माउलींच्या या ‘मैत्र’ संकल्पनेची अत्यंत गरज आहे.
ज्ञानेश्वर महाराजांनी मागितलेले हे पसायदान कोणत्याही विशिष्ट काळापुरते मर्यादित नाही, तर ते त्रिकालाबाधित आहे. पसायदानाचा केवळ पाठ करणे पुरेसे नसून त्यातील विचार आपल्या आचरणात आणणे माउलींना अपेक्षित आहे. जोपर्यंत या पृथ्वीवर मानवी संस्कृती अस्तित्वात आहे, तोपर्यंत माउलींचे पसायदान जगाला शांती, समरसता व समन्वयाचा मार्ग दाखवत राहणार आहे.
