Opinion

माझं काम रुतलेला काटा काढून टाकायचा एवढंच आहे

गोष्ट २०१० सालची आहे. आता बारा वर्षे लोटून गेली आहेत. एखादी घटना घडून गेल्यानंतर कायम स्वरूपी मनात कोरून रहावी अशी एखादी आठवण असते. एखादा आयुष्यात आलेला नकारत्मक अनुभव किती खोलवर लिहावं असाही प्रश्न पडतो. पण हा मी पचवलेला अनुभव आहे. सुदैवाने मी ज्या संघटनेच्या, विचारधारेच्या प्रवाहात वाढलो त्यामुळे मी हे मी कदाचित पचवू शकलो असेन. सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यात असे अनुभव आपली परीक्षा पाहणारे असतात.

२०१० साली माझी पुण्यात शिक्षण क्षेत्रात नोकरी करावी अशी इच्छा होती. आणि त्या अर्थाने मी काही प्रयत्न करत होतो. पुणे विद्यापीठाच्या रिझर्व्हेशन सेलच्या माझी मी नोंदणी केलेली होती. त्या लिस्टच्या आधाराने पुण्याच्या Trinity Campus मधून मला मुलाखतीसाठी बोलावणे आले होते. मी अगदी वेळेत तयारी करून पुण्यात आपण शिफ्ट व्हावे अशी मानसिकता घेऊन मी ह्या मुलाखतीसाठी गेलो होतो. विद्यापीठातील मान्यवर माणसे माझ्या मुलाखतीसाठी होती. व्यावसायिक आणि शिक्षण क्षेत्रातील अनुभव, नेटची परीक्षा आणि झालेल्या प्रश्नोत्तराच्या आधारे माझी मुलाखत पार पडली.

दरम्यान तिथल्या एमबीए महाविद्यालायाच्या संचालक (नामोल्लेख टाळला आहे) ह्यांच्याशी आमच्या काही जणांच्या गप्पाचे अनौपचारिक नियोजन करण्यात आलेले होते. गप्पांच्या दरम्यान Scheduled Casteच्या लोकांना नीटशिकवता येत नाही अशी टिप्पणी त्यांनी केली. ही प्रतिक्रिया ऐकून मनातून खूप वाईट वाटले. मी त्यांना अगदी संयमाने काही सांगावे असे वाटत होते. पण आपली गरज आणि आवश्यकता लक्षात घेऊन फार काही बोलायचे नाही असे मी ठरवले.

मुलाखतीचा दुसरा राऊंड सुरु झाला. हा साधारण पगाराच्या आणि इतर अपेक्षा ह्यासाठी असतो. ह्या मुलाखतीसाठी व्यवस्थापनातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. त्यात अध्यक्ष जाधव, Trinity Engineering College चे प्राचार्य उपस्थित होते. पगाराची व्यवस्थित बोलणी झाली. सगळ्या चर्चेनंतर मीही आनंदात होतो. थोडी आधी नकारत्मक टिप्पणी ऐकलेली होती. त्या पार्श्वभूमीवर माझा निवडीसाठी विचार होतो आहे ह्याचा मनात आनंद होता. पण मनात त्या टिप्पणीने अस्वस्थता निर्माण केलेली होती. ह्या क्षणाला मी आयुष्यातील एक महत्वाचा निर्णय घेतला. या ठिकाणी आपण नोकरी नाही करायची. थोडी रिस्क होती. कुणा एका दोघांना विचारून निर्णय घ्यावा असं वाटत होते. समोर चांगला पगारही दिसत होता.

ह्या संस्थेचे अध्यक्ष जाधव, व्यवस्थापनाचे इतर सदस्य, Trinity Engineering College चे प्राचार्य अशी काही जणांची माझी भेट झाली. आणि त्यांना मी माझा हा निर्णय कळवला. Scheduled Casteच्या लोकांना नीट शिकवता येत नाही अशी धारणा मनात संचालकांच्या मनात असताना ह्या वातावरणात मी शिकवणे चांगले नाही. म्हणून आपल्याकडे रुजू होऊ शकत नाही. क्षमस्व. असं म्हणालो. त्यांना माझ्याविषयी उत्सुकता वाटली. मग माझी अधिक खोलवर चौकशी, चर्चा झाली. त्यांनी काही वेळासाठी मला थांबायला सांगितले. माझा निर्णय झालेला होता. पण अधिक गप्पा झाल्यामुळे मी थांबलो.

पेचप्रसंग हा होता. विद्यापीठाच्या निवड समितीने माझी निवड केलेली होती. नियमानुसार जागा भरणे आवश्यक होते. मी तर नाही म्हणालो. निवड समितीने केलेली निवड, झालेली चर्चा आणि माझी प्रतिक्रिया ह्याचा एक गोंधळ उडाला. काही तासाच्या अवधीनंतर तातडीने माझ्या हातात Trinity Engineering College चे प्राचार्य ह्यांनी मला Appointment Order त्याच Campus मधील दुसऱ्या एमबीए कॉलेजची दिली. Appointment Order देताना त्यांनी मला हळूच एक गोष्ट सांगितली. सर वाईट वाटून घेऊ नका. आम्ही दिलगीर आहोत. माझी बहिण तुमच्या समाजात दिली आहे. तुमच्या भावना नीट माझ्यापर्यंत पोहचल्या. मी त्यांना म्हटलो. सर मनातून वाईट वाटले पण एक सांगू ज्या विचारधारेच्या संस्कारात मी वाढलो त्याचा भाग म्हणून ह्या सामाजिक प्रश्नाला वैयक्तिक आयुष्यात हाताळताना मोठा संयम लागतो. तीव्र प्रतिक्रिया देऊनही चालणार नाही. पण ही मानसिकता दुरुस्त करण्याची गरज आहे. जर मोकळे वातावरण नसेल आणि पूर्वग्रह दुषित काही संकल्पना असतील तर हे प्रश्न कधीही सुटणार नाही. आजही ती Appointment Order मी जपून ठेवली आहे आठवणी सारखी.

दरम्यान वडिलांच्या आजारपणामुळे मी नगरमध्येच रहायचे ठरले. परीक्रमाची संधी माझ्या हातात आली. मी नोकरी सुरु झाली. ३ ऑक्टोबर २०१० साली वडिलांचे निधन झाले. दरम्यान Trinity Campus मधे माझ्या जागेवर एका प्राध्यापकांची नेमणूक झाली. पण विद्यापीठ निवड समितीमुळे माझी निवड केलेली असल्यामुळे त्यांचे Approval होणार नव्हते. हे प्राध्यापक आणि त्यांच्या आई मला नगरला भेटायला येणार आहेत असे मला कळाले. मला कळाले नाही माझी ह्यांची फारशी ओळख नाही पण हे आईसह भेटायला का येणार आहेत. अजून वडिलांना जाऊन दहा दिवसही झालेले नव्हते. मी Trinity च्या महाविद्यालयात रुजू होऊ शकणार नाही आणि ना हरकत असे पत्र त्यांना हवे होते. ऐकून सगळ्या परिस्थितीत माझं निर्णय आधीच झालेला असल्यामुळे मीही पत्र दिले. ह्या पत्राने मात्र अनेक गोष्टी मला उलगडल्या. त्यातून मला माझी निवड झाल्याचे लक्षात आले.

माझ्या त्या दिवसाच्या निर्णयानंतर मी अस्वस्थतेने काही मान्यवरांना मेसेज टाकला होता. सगळे माझ्या पाठीशी होते. आजही ह्या निवडी काही प्रमाणात वादातीत आहे. त्यातली रचनेची हेळसांड मोठ्या प्रमाणात आहे. आरक्षणाच्या जागेचा खेळ मोठा आहे. त्याचे म्हणून सामाजिक दुष्परिणाम आहेत. यांत्रिकी व्यवस्थेच्या फारसे ते पचनी न पडणारे आहेत. का कुणास ठाऊक ह्या सगळ्या व्यवस्थेत पारदर्शकतेचा मोठा अभाव जाणवतो ही वस्तूस्थिती आहे. अनुभवातील तथ्य जाणावे ह्याच एका हेतूने मी नामोल्लेख केला आहे. आजही मला माझ्या ह्या निर्णयाबद्दल पश्चताप नाही.

सुदैवाने संघाच्या आणि विद्यार्थी परिषदेच्या एका सकारात्मक वातावरणात वाढल्यामुळे जखम मोठी झाली नाही पण व्रण शिल्लक राहिला अशी स्थिती आहे. ह्या अनुभवानंतर समग्रता म्हणून मी अधिक लिहले आहे आणि व्यक्त झालो आहे. प्रसंग गोष्ट छोटी असते पण सामाजिक जीवनात त्याचे अनेक अर्थ उमटत रहातात. मी अनेकांना पाहिलं आहे आयुष्यात आलेल्या नकारत्मक अनुभवामुळे विचारांची दिशा बदलली आहे. मी उदाहरणादाखल हा प्रसंग सांगितला. असे काही प्रसंग मी नीटच पचवले आहेत. अनुभव, वैचारिक मांडणी आणि परिस्थिती ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण कसं वागायचं ह्याचं एक मोठं सामाजिक दायित्व आहे. प्रसंग रेषा तयार करतो. आपण त्या पुसायाच्या असतात. मग हे का लिहावंसं वाटलं असा प्रश्न पडेल. फ्रेमवर्क समजून घेताना दिसतं तेवढंच समजून घ्यायचं नसतं. अनेक बाजू असतात त्याही पहाव्या लागतात ह्याचा एक अंदाज यावा म्हणून हा प्रसंग लिहला आहे. चर्चेपेक्षा बोध महत्वाचा. माझं काम रुतलेला काटा काढून टाकायचा एवढंच आहे. तेवढंच मी केलं आहे. समाजातील अनेक काटे दूर करण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. 

Back to top button