HinduismNews

सौगंध राम की खायी थी , हमने मंदिर वही बनाया है.. भाग १०

ayodhya ram mandir inauguration ramlala pran pratishtha part 10

(रामजन्मभूमीची संघर्षगाथा उलगडणारी १८ भागांची रोमांचकारी मालिका)

मराठा साम्राज्य..

औरंगजेबाच्या राजवटीत मुस्लीम साम्राज्याचे पतन व्हायला सुरुवात झाली होती. १७०७ साली त्याने प्राण सोडल्यानंतर एक एक करत मुस्लीम सत्तेच्या इमारतीचा डोलारा कोसळू लागला,त्याची सर्वोच्च परिणती माधवराव पेशवा आणि नाना फडणवीस यांच्या काळात झाली.

हळूहळू छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतात स्वराज्य स्थापनेचे ध्येय तडीला जात होते. १७७१ मध्ये महादजी शिंदे यांनी दिल्लीवर हिंदवी स्वराज्याचे झेंडे फडकावले. मोगल बादशाह शाह आलम याला पदच्युत करून आपला प्रतिनिधी म्हणून त्याला सिंहासनावर बसवले. तो नाममात्र शासक होता आणि शासनाची सर्व सूत्रे मराठ्यांच्या हातात होती. ही स्थिती इंग्रजांनी १८१८ मध्ये मराठ्यांचा पराभव केला तो पर्यंत राहिली.

महादजींच्या प्रयत्नाने सन १७८९ मध्ये शाह आलमने हिंदूंच्या भावना लक्षात घेऊन कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावणाऱ्या गोवध प्रथेस बंदी केली. १७९० मध्ये सर्वांशी विचार विनिमय करून मथुरा, वृंदावन आणि काशी येथील तीर्थस्थाने महादजींच्या माध्यमातून हिंदूंच्या हाती सोपवली. ७ ऑगस्ट १७९० रोजी महादजी शिंदे यांनी त्या आदेशाचा स्वीकार केला. थोड्याच काळानंतर नाना फडणविसांनी रामजन्मभूमी आणि इतर सर्व तीर्थस्थाने परत करण्याचा आग्रह धरला. शाह आलम सहमतही झाला. परंतु देशाच्या दुर्दैवाने महादजी, नाना आणि शाह आलम या तिघांच्याही अकाली मृत्यूमुळे ते कार्य अपुरे राहिले..

दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भारतीय झेंड्याऐवजी इंग्रजांचा युनियन जॅक आला. अयोध्येची सत्ता नबाब सआदत अलीच्या हाती आली. हिंदूंच्या हृदयातील रामजन्मभूमीच्या उद्धाराची तळमळ शांत झाली नव्हती. अमेठीचे राजा गुरुदत्त सिंह आणि पिपराचे राजकुमारसिंह यांनी रामजन्मभूमीवरील मंदिरावर पुनः ताबा मिळवण्यासाठी नबाबाच्या सैन्यावर पाच आक्रमणे केली. कधी हिंदू तर कधी नबाबी सैन्याचा विजय झाला. गुरुदत्त सिंहांनी सआदत अलीच्या सैन्याला १७६३ मध्ये पराभूत केले आणि नबाब सआदत अलीने सतत होणाऱ्या हिंदूंच्या हल्ल्याला कंटाळून अकबराप्रमाणेच हिंदूंना रामजन्मभूमीवर पूजापाठ करण्यास अधिकृतपणे अनुमती दिली.

सआदत अलीनंतर नसीरउद्दीन हैदर कारकिर्द चालू झाली. मकरहीच्या राजाच्या नेतृत्वाखाली हिंदूनी तीन हल्ले केले शेवटच्या हल्ल्यात हिंदू विजयी झाले, पण नबाबी सेनेने पुनः आपला अधिकार स्थापन केलाच, त्यानंतर वाजीद अली शाहच्या १८२२ कार्यकाळात हिंदूंनी रामजन्मभूमी परत मिळवण्यासाठी दोन मोठे हल्ले केले.

सन १८५७ मध्ये गोंडांचा राजा देवीबक्ष सिंह यांच्या नेतृत्वाखाली ४-५ अपवाद सोडता, अयोध्येच्या सर्व राजेरजवाड्यांनी एकत्र होऊन रामजन्मभूमीच्या मुक्तीसाठी संग्राम केला. त्यात नबाबी सेनेचा पूर्णपणे पराभव झाला, त्यावेळेस अयोध्येच्या महाराजा मानसिंहांनी नबाब वाजीद अली शहाशी बोलणी करून, चबुतरा पुनः उभारण्याची आज्ञा मिळवली. औरंगजेबाने उद्ध्वस्त केलेला चबुतरा आणि त्यावर तीन फूट उंचीचे छोटेसे मंदिर पुन उभारण्यात आले आणि त्यात भगवान रामचंद्राची स्थापना करण्यात आली.

इंग्रजांची क्रूर कुटनीती..

सन १८५८ मध्ये पूर्ण भारताची सत्ता काबीज करणाऱ्या इंग्रजांना सुद्धा ह्या विषयाचे महत्व आणि सामर्थ्य समजलेले होते. म्हणून आपली सत्ता बळकट करण्यासाठी त्यांनी त्या विषयाचा वापर सातत्याने केला. हिंदू व मुस्लीम समाज आपल्याविरुद्ध कधीच एकत्र येऊ नयेत ह्यासाठी इंग्रजांनी ज्या वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या त्यात रामजन्मभूमीचा विषय कधीही पूर्णपणे सुटू न देणे ही एक प्रमुख युक्ती होती. ज्या ज्या वेळेला हा विषय निर्णायकरित्या सुटण्याची शक्यता निर्माण झाली त्या त्या वेळी हस्तक्षेप करून त्यांनी तो संघर्ष संपणार नाही ह्याची काळजी घेतली.

सन १८८६ मध्ये आपल्या समोरील दिवाणी दाव्याचा निकाल देताना फैजाबादचे ब्रिटीश जिल्हा न्यायाधीश पी. ई. डी. चामियार ह्यांनी ‘प्राचीन राम मंदिर पाडून तेथे मशीद उभारण्याचा प्रयत्न झाला हे खरे असले तरी ३५० वर्षांपूर्वी घडलेल्या चुका आता सुधारता येणार नाहीत’ असे अजब तर्कशास्त्र मांडून हा प्रश्न निर्णायकरीत्या सोडवायला नकार दिला. पण १८८६ मध्ये आधुनिक न्यायव्यवस्थेच्या आधाराने सुरु केलेला हा लढा सुद्धा २०१९ पर्यंत लढवला गेला आणि तोही सकल हिंदू समाजाने जिंकल्यानंतरच संपला.

क्रमशः

Back to top button