Opinion

१५८३ चा कुंकळ्ळीचा उठाव: इतिहासातील एक अज्ञात पान

कॅथलिक चर्चचे पोप निकोलस (पाचवे) यांनी इसवी सन १४५५ मधे पोर्तुगालचा राजा अल्फोंसो (पाचवा) याच्या नावे रोमानस पोंटिफेक्स नावाची सनद अथवा अधिकारपत्र (Papal Bull) जारी केले. त्या अधिकारपत्रानुसार पोर्तुगालला आफ्रिका खंडातील केप बिजाडोरच्या दक्षिणेकडील बिगर ख्रिस्ती प्रांतांमधे आपल्या वसाहती स्थापण्याचे, व्यापार सुरू करण्याचे आणि तेथील प्रजेला गुलामगिरीत अडकवण्याचे अधिकार बहाल करण्यात आले. पोर्तुगीज सिंहासन व व्हेटिकन धर्मपीठ यांनी एकत्रितपणे धर्माधिष्ठित राजसत्ता स्थापित करून आशिया खंडामधे ख्रिस्ती मताचा प्रचार करण्याची योजना आखून या अधिकारांचा वापर करण्याचे ठरवले. आल्फोंसो दि अल्बुकर्कच्या आगमनाने गोव्यामधे या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली. राजसत्तेच्या जोडीने धर्मप्रसार घडवून रोमानस पोंटिफेक्स प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अल्बुकर्कसोबत पोर्तुगालहून धर्मप्रचारकांची फौज देखील आली होती.

पोर्तुगीजांनी जेव्हा सासष्टी काबीज करून रायतूरचा किल्ला हस्तगत केला, तेव्हा कुंकळ्ळी, असोळणे, वेरोडा, चिचोळणे, वगैरे गावे त्यांच्या वर्चस्वाखाली आली. या गावांमध्ये त्या काळी गावकार पद्धती प्रचलित होती. या पद्धतीमध्ये प्रत्येक गावाचा अथवा वाड्याचा एक प्रमुख असे, जो करवसुली करायचा आणि रायतूर किल्ल्यावरील अधिकाऱ्याकडे सुपूर्त करायचा. ‘भिवसा’ या गावातील महादेव मंदिर उद्ध्वस्त करून तेथील काही लोकांचे धर्मांतरण केले गेले. तेव्हापासून पोर्तुगीज सत्तेचा दुष्ट हेतू हळू हळू ग्रामस्थांच्या लक्षात येऊ लागला. त्याला विरोध म्हणून तेथील ग्रामस्थांनी रायतूर किल्ल्यावर कर भरणे बंद केले.

ग्रामस्थांच्या या धोरणाने संतप्त झालेले पोर्तुगीज अधिकारी व धर्मप्रचारक अनेक वेळा या गावांवर चालून आले. त्यांनी अनेकांची हत्या केली, देवळे मोडली. ग्रामस्थांनीही अनेकदा यशस्वी रित्या प्रतिकार केला व मोडलेली देवळे पुन्हा बांधली.

१५ जुलै १५८३ या दिवशी पाच पाद्री, एक पोर्तुगीज माणूस आणि १४ धर्मांतरित नवख्रिस्ती कुंकळ्ळी गावांमध्ये प्रविष्ट झाले आणि गावांमध्ये नवीन चर्च बांधण्यासाठी संभाव्य योग्य जागांचे परीक्षण व सर्वेक्षण करू लागले. याच दरम्यान एका पाद्र्याने एका गाभण गाईला मारून तिचे प्रेत जवळच्या तळ्यात फेकले. या घटनेने ग्रामस्थ संतप्त होऊन पेटून उठले. हाती मिळतील ती हत्यारे घेऊन ते चाल करून आले. स्वतःच्याच जन्मभूमीत सक्तीची धर्मांतरे, देवळांचा विध्वंस, निरपराधांचे हत्यासत्र इत्यादींमुळे जनतेच्या मनात राग खदखदत होताच. त्या दिवशी त्या रागाचा भडका उडाला. या भडक्यामध्ये पाचही पाद्री व त्यांच्या बरोबर आलेले इतर सर्वजण मृत्युमुखी पडले. गोव्याच्या इतिहासातील पोर्तुगीजांविरुद्धचे हे पहिले यशस्वी बंड होते. तो दिवस होता १५ जुलै १५८३. ज्यांनी आमच्या धर्म, संस्कृती व श्रद्धास्थानांवर घाला घातला, त्या दुष्ट सैतानांच्या रक्ताने देवी शांतादुर्गेला घातलेल्या अभिषेकाची ही विजयगाथा आजही कुंकळ्ळीचे ग्रामस्थ अभिमानाने सांगतात. पोर्तुगीजांचे जुलूम व धर्मप्रचारकांचे धार्मिक अत्याचार यांच्याविरुद्धचे हे पहिले मोठे बंड.

वरील घटनेचा सूड म्हणून पोर्तुगीजांनी कुंकळ्ळी व इतर गावांवर नंतरच्या काळात वारंवार हल्ले केले आणि तेथील घरेदारे, शेते, वगैरेंचा विध्वंस केला. या नेहमीच्या जाचाला कंटाळून गावातील म्होरक्यांनी पोर्तुगीजांशी युद्ध-विराम-संधी करायचे ठरवले. १६ ग्रामप्रमुख असोळणा किल्ल्यावर निशस्त्र होऊन बोलणी करण्यासाठी गेले. परंतु पोर्तुगीज शासनाने त्यांच्याशी कपट केले. किल्ल्यामध्ये बंदिवान बनवून अमानुष छळ करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यातील फक्त एक जण तिथून निसटून जाण्यात यशस्वी झाला.

कुंकळ्ळीतील १६ महानायकांची नावे खालील प्रकारे आहे

काळगो नाईक उर्फ काळू, मोलुको नाईक उर्फ मोलू, आग नाईक उर्फ वाघ, सांतु चाटींम उर्फ सांतु, रामगारो नाईक उर्फ राम, खांप्रु नाईक, शाबू नाईक, टोपी नाईक, जंग नाईक, पोळपुरो नाईक, भोजरो नाईक, शांता नाईक, विठोबा नाईक, येसो नाईक, गुणो नाईक आणि जीवलो नाईक

कुंकळ्ळीतील लोकांनी त्यानंतरही आपला लढा सुरूच ठेवला. पण तोपर्यंत गावातील बर्‍याच जणांचे धर्मपरिवर्तन झालेले होते. गावामध्ये एक चर्च सुद्धा बांधले गेले होते. उरलेल्या हिंदुनी धर्मांतरापासून व अत्याचारांपासून वाचण्यासाठी देवी शांतादुर्गेसह तिथून पळून जाणे पसंत केले.

हिंदू देवालयांचा विध्वंस व सक्तीची धर्मांतरे घडवून आणताना जे ख्रिस्ती पाद्री मारले गेले, त्यांना नंतरच्या काळात ख्रिस्ती समाजाने व चर्चने हौतात्म्य बहाल करून गौरविले. एकोणिसाव्या शतकात पोर्तुगीज शासनाने या सर्व तथाकथित हुतात्म्यांचे स्मारक सुद्धा बांधले. सैतानी पोर्तुगीज शासक व धर्मप्रचारकांबरोबर लढताना कुंकळ्ळीच्या ज्या ग्रामप्रमुखांनी खरेखुरे हौतात्म्य पत्करले होते, त्यांचे स्मारक उभे राहण्यासाठी मात्र २७ नोव्हेंबर १९९९ हा दिवस उजाडावा लागला. गोव्याच्या आत्तापर्यंतच्या शैक्षणिक पाठ्यक्रमामध्ये कुंकळ्ळीच्या वीरपुत्रांच्या या बलिदानाचा पुसटसा देखील उल्लेख आलेला नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

**

Back to top button