HinduismNews

अवघा रंग एक झाला.. भाग १२

“अवघा रंग एक झाला”.. या विशेष मालिकेतून आपण समाजाला समरस करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या संतांबद्दल आपण जाणून घेणार आहोत…

प्रपंचाबरोबर परमार्थ साधण्याची स्वानुभवातून शिकवण देणारे संत एकनाथ महाराज..

एका जनार्दनी विनंती। येऊनी मनुष्य देहप्रती।
करोनीया भगवद्भक्ती। निजात्मप्राप्ती साधावी।

या दोनच ओव्यात एकनाथांनी साऱ्या जीवनाचे सार सांगितले आहे .मनुष्य देह आत्मप्राप्तीसाठी असून भगवत भक्तीतच या जन्माचे सार्थक आहे.

भगवतोत्तम, शांतीब्रह्म असलेल्या संत एकनाथांना दत्तात्रेयांनी आपल्या मूळ रूपात दर्शन दिले होते. या अप्रतिम दर्शनाचे वर्णन नाथांनी आपल्या एका आरतीमधून केले होते.

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा….
समाधि न ये ध्याना… हरली भवचिंता।।

नाथ आपल्याला आवर्जून सांगत आहेत की,`श्रीदत्तात्रेय हे त्रिगुणात्मक आहेत. उत्पत्ती-स्थिती-लय या तीनही तत्त्वांचे मीलन या दैवतात झालेले आहे. ब्रह्मा-विष्णू-महेश या दैवताच्या ठिकाणी एकवटलेले आहेत.

अनुताप झाल्याशिवाय देवाचे नाव मुखी येत नाही. जेथे अर्थ आहे तेथे परमार्थ नाही. हरीनाम एकच शाश्वत असून सगळ्यांना ते घेण्याचा संपूर्ण अधिकार आहे. जे पांडुरंगाला शरण जातात त्यांना मृत्यूची भीती नसते. भक्ती हे मूळ आहे तर वैराग्य हे घर आहे व साधू,संतांची भेट होणे हे परमभाग्य होय. असे नाथ महाराज नेहमी म्हणत असत.

नाथांची वाणी जेवढी रसाळ तेवढीच त्यांची लेखणीही ओघवती होती. कृष्णभक्ती व आत्मबोधाचे वर्णन असलेला ‘रूक्मिणी स्वयंवर’ हा ग्रंथही त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देतो. त्याच बरोबर वासुदेव, वाघ्या, मुरळी, कोल्हाटीण, विंचू, सर्प, दळण, कांडण, जोगवा, गोंधळ, कापडी, पांगळा अशा अनेक नित्य जीवनातील प्रकारांवर नाथांनी भारूड रूपात केलेले कवित्व सोप्या भाषेत विदित केलेले अध्यात्मच आहे.

एकनाथांनी सकल समाजाला अध्यात्माचे ज्ञान व्हावे म्हणून प्राकृत भाषेत विपुल लिखाण केले.मुख्य म्हणजे संसारात राहूनही परमार्थ साधता येतो हे स्वानुभवाने दाखवून दिले.

अवघा रंग एक झाला
अवघा रंग एक झाला
Back to top button