“अवघा रंग एक झाला”.. या विशेष मालिकेतून आपण समाजाला समरस करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या संतांबद्दल आपण जाणून घेणार आहोत…
संत नामदेव महाराज
सर्वांभूती विठ्ठल आहे आहे साचे। हे तंव वेदींचे वचन जाण ॥
मार्ग हाचिं सोपा गेले मुनिजन । जनी जनार्दन हाचि भावो ।॥
अर्थात :- सर्व प्राणिमात्रांमध्ये एकाच परमात्म्याचे अस्तित्व आहे. त्यामुळे समता, बंधुभाव आणि सर्वात्मभाव जोपासावा.
मध्ययुगीन भारतीय संतपरंपरेतील बहुभाषिक संत म्हणून सर्वमान्य झालेल्या संत नामदेवांचे वारकरी संप्रदायातील स्थान अनेक दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. संत नामदेवांनी आपल्या अमृताहूनी गोड असलेल्या मराठी आणि हिंदी अभंगवाणीने वारकरी संप्रदायाचा भारतभर प्रभावी प्रचार केला.
गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश इत्यादी प्रांतांत भ्रमण करून त्यांनी उत्तर भारतात विठ्ठलनामाचे बीज सर्वत्र पेरले. ‘पुंडलिक वरदा हरि विठ्ठल’चा गजर उत्तरेत घुमत राहिला आणि दक्षिणेची संस्कृती उत्तरेत रूजली ती संत नामदेवांमुळेच. ते उत्तम संघटक असल्यामुळे विठ्ठलनामाच्या भावसूत्रात विविध प्रदेशांतील समाजमने त्यांनी एकत्र गुंफली.
सामान्यांच्या लोकबोलीतून अभंग गाऊन धर्ममंदिराचे बंद असलेले दरवाजे त्यांनी उपेक्षितांना, वंचितांना उघडून दिले. वर्णभेद, प्रांतभेद, भाषाभेद, व्यवसायभेद इत्यादी संकुचित कल्पनांचा निरास करून भक्तश्रेष्ठ नामदेवांनी भक्तीच्या अनुषंगाने समता आणि मानवता या तत्त्वांचा कृतिशील प्रसार केला.
