गणेशोत्सवात पर्यावरण संवर्धन आणि आपल्या परंपरा-संस्कृतीचे जतन करणारी Gen Z!
पर्यावरणस्नेही विचार मनात ठेवून गेली पाच वर्षे स्वतःच्या हाताने शाडूमातीची गणेशमूर्ती घडवून त्या बाप्पाची घरात प्रतिष्ठापना करणारी Gen Z युवती दृष्टी हिच्याकडे पाहिले की, ही पिढी हुशार आणि तितकीच समाजाप्रती सजग आहे, हे उमगते. लाडक्या बाप्पाची मूर्ती स्वतःच्या हाताने घडवण्याचा आनंद शब्दातीत असतो, असे दृष्टी सांगते. पीओपीच्या मूर्तींमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी शाडूमातीच्या गणेशमूर्तींचा पर्याय स्वीकारणे ही काळाची खरी गरज आहे. दृष्टीसारखे अनेक तरुण-तरुणी आज या ना त्या प्रकारे सामाजिक भान जपत पर्यावरण संवर्धन आणि आपल्या परंपरा-संस्कृतीचे जतन करण्यासाठी पुढाकार घेत इतरांनाही प्रेरणा देत आहेत, हे विशेष. नव्या पिढीच्या या पुढाकारातूनच संस्कारांचा आणि सांस्कृतिक वारशाचा प्रवाह पुढच्या पिढीकडे अखंड वाहत राहणार आहे.
चला, तर आपणही हा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करूया!