कोकण आणि गोव्यातील गणेशोत्सवात माटवी किंवा माटोळीच्या सजावटीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. माटी, माटवी, माटोळी अशा वेगवेगळ्या नावाने प्रचलित असलेल्या या सजावटीचा निसर्गाशी फार जवळचा संबंध आहे. निसर्गात सहज उपलब्ध होणारी फुले, फळे, भाज्या आणि पत्री यांचा उत्तमरित्या समतोल साधून कलात्मक पद्धतीने सजावट केली जाते. ही सजावट कोकणातील गणेशोत्सवाचे केवळ आकर्षणच नाही, तर निसर्गाशी असलेले आपले जिव्हाळ्याचे नातेही अधोरेखित करते. भक्तीभाव आणि निसर्ग यांची सुंदर सांगड घालणारी, गणरायाच्या वर सजवली जाणारी माटोळी ही कोकण आणि गोवा येथील गणेशोत्सवाच्या समृद्ध लोकपरंपरेचे वैशिष्ट्य म्हणता येईल.