News

आजच्या काळात करुणेचे वैश्विकीकरण ही काळाची गरज – डॉ. मोहन भागवत

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते कैलाश सत्यार्थी लिखित ‘करुणानायक राम’ पुस्तकाचे प्रकाशन

नवी दिल्ली, २७ नोव्हेंबर.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत जी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राच्या भीम सभागृहात नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक कैलाश सत्यार्थी यांच्या ‘करुणानायक राम’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रभात प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात भगवान श्रीराम यांचे व्यक्तिमत्त्व, जीवनदृष्टी आणि आदर्श यांचा करुणा, मानवी संवेदना, सामाजिक न्याय आणि नैतिक उत्तरदायित्व या व्यापक संदर्भांतून वेध घेण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला भूतानच्या राजकुमारी सोनम देचन वांगचुक विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. केंद्रीय संस्कृती आणि पर्यटनमंत्री गजेंद्र सिंह शेखावत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पुस्तकाचे लेखक आणि नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित कैलाश सत्यार्थी, इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे (IGNCA) सदस्य सचिव डॉ. सच्चिदानंद जोशी, प्रकाशक प्रभात कुमार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

डॉ. मोहन भागवत यांनी भगवान श्रीराम यांच्या चरित्रातील करुणा आणि वर्तमान काळातील तिची प्रासंगिकता याविषयी विचार मांडले. ते म्हणाले, “आपल्या प्रत्येकाच्या मनात एक सहजभाव असतो. त्यातून प्रेरणा घेऊन आपण दुसऱ्याचे दुःख दूर करण्यासाठी काहीतरी करतो. हाच करुणेचा भाव आहे.”

डॉ. भागवत म्हणाले, “भगवान श्रीराम यांच्या चारित्र्यात करुणा, प्रतिष्ठा आणि लोककल्याणाची भावना स्वाभाविकपणे दिसून येते. राम आणि रावण यांच्यातील मूलभूत फरक हाच होता की, रावण ‘मी’ आणि ‘माझे’ या अहंकारात गुरफटलेला होता; तर रामाचे जीवन करुणा आणि धर्माचरणाचा आदर्श घालून देणारे आहे. ‘मी’ आणि ‘माझे’ यापलीकडे पाहता न येणे, म्हणजे अहंकार. या भावनेतून वर आल्यावरच आपण सर्वजण एकमेकांशी जोडलेले आहोत, या शाश्वत सत्याची जाणीव होते.”

ते पुढे म्हणाले, “करुणा हा काही विशेष गुण नाही, तर तो मनुष्यस्वभावातील सहजभाव आहे. दुसऱ्याचे दुःख जेव्हा आपलेच दुःख वाटू लागते आणि ते कमी करण्यासाठी आपण आपल्या क्षमतेनुसार प्रयत्न करतो, तेव्हा करुणा प्रकट होते. केवळ सहानुभूती व्यक्त करणे म्हणजे करुणा नव्हे. करुणा आपल्याला सेवा आणि लोककल्याणासाठी कृती करण्याची प्रेरणा देते. एकटेपणात राहून आपण कधीही खऱ्या अर्थाने आनंदी होऊ शकत नाही. आपला आनंद हा समाजाचे कल्याण, निसर्गाचे संवर्धन आणि संपूर्ण विश्वाच्या हिताशी अतूटपणे जोडलेला आहे.”

ते म्हणाले, “म्हणूनच केवळ प्रभू श्रीरामांवर श्रद्धा असणे पुरेसे नाही, तर त्यांच्या आदर्शांचे आचरण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रभू श्रीरामांच्या चारित्र्यातून प्रेरणा घेऊन, आपल्या जीवनात सन्मानाची भावना, कर्तव्यनिष्ठा आणि करुणा यांचा अंगीकार करणे, हेच श्रद्धेचे खरे स्वरूप आहे. आज देशासमोर आणि जगासमोर असलेल्या अनेक समस्यांच्या मुळाशी ‘मी’ आणि ‘माझे’ हा आग्रह आणि करुणेचा अभाव दिसून येतो. अशा काळात करुणेचा विचार वैश्विक स्तरावर पोहोचणे आवश्यक आहे. जेव्हा आपण आपल्या मर्यादित स्वार्थाच्या पलीकडे जाऊन संपूर्ण सृष्टीविषयी आपलेपणाचा भाव निर्माण करू, तेव्हाच खऱ्या अर्थाने मानवता आणि विश्वकल्याणाच्या दिशेने वाटचाल करू शकू.”

भूतानच्या राजकुमारी सोनम देचन वांगचुक म्हणाल्या की, कैलाश सत्यार्थी यांनी भूतानला रामराज्याचे उत्तम उदाहरण म्हटले, ही भूतानसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. भगवान श्रीराम यांचे आदर्श समजून घेण्यासाठी पुढे येणाऱ्या तरुणांचेही त्यांनी कौतुक केले.

गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले, “ करुणानायक राम’ हे शीर्षक एक गहन तात्त्विक विचार व्यक्त करणारे आहे. करुणेची प्रेरणा लाभते, तेव्हाच सत्तेला खरा अर्थ प्राप्त होतो. प्रभू श्रीरामांचे चारित्र्य हे कर्तव्यनिष्ठा आणि संवेदनशीलता यांचा आदर्श समन्वय दर्शवते. प्रभू श्रीराम हे भारताची संस्कृती, जीवनमूल्ये आणि सार्वजनिक जीवन यांसाठी प्रेरणास्रोत आहेत. व्यक्ती आणि समाजाला जोडणाऱ्या सामूहिक चेतनेचे ते प्रतीक आहेत. रामाला समजून घेणे म्हणजे भारताला समजून घेणे होय.

त्यांचे नेतृत्व केवळ सत्ता किंवा सामर्थ्यातून नव्हे, तर त्यांच्या परिपूर्ण चारित्र्यातून प्रतिबिंबित होते.करुणा हा केवळ कोमल भाव नसून आपल्यातील परिवर्तन घडवणारी शक्ती आहे. प्रभू श्रीरामांचे चारित्र्य हे गरीमा, कर्तव्यनिष्ठा आणि संवेदनशीलता यांचा विलक्षण संगम आहे. प्रभू श्रीरामांचे नेतृत्व, त्यांचे निर्भय व्यक्तिमत्त्व, पुत्र म्हणून त्यांनी घालून दिलेला आदर्श आणि नातेसंबंधांचा सन्मान राखण्याची त्यांची भूमिका समजून घेणेही महत्त्वाचे आहे. श्रीरामांच्या चारित्र्यातील एखादा गुण जरी आपण आत्मसात करून त्यानुसार आचरण केले, तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या असीम पैलूंचा परिचय करून घेण्याच्या प्रवासाला सुरुवात होऊ शकते.

यावेळी कैलाश सत्यार्थी यांनी ‘करुणानायक राम’ या पुस्तकाची वैचारिक पार्श्वभूमी आणि त्यातील मध्यवर्ती विचार स्पष्ट केला. भगवान श्रीराम यांचे जीवन करुणेच्या व्यापक दृष्टिकोनातून समजून घेण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. करुणा म्हणजे केवळ दयाळूपणा किंवा भावनेपुरती मर्यादित गोष्ट नव्हे. व्यक्ती, समाज आणि शासनव्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य असलेली ती एक प्रभावी नैतिक शक्ती आहे, हा या पुस्तकाचा मुख्य विचार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, “माझे मर्यादित ज्ञान आणि वैयक्तिक अनुभव यांच्या आधारे मी या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की, रामाच्या जीवनातील सर्वांत महत्त्वाचा आणि व्यवहार्य पैलू म्हणजे ते करुणानायक आहेत. माझ्यासाठी करुणा ही केवळ भावनेपुरती मर्यादित नाही. दुसऱ्याचे दुःख आपलेच मानून ते दूर करण्यासाठी कृती करण्याची प्रेरणा देणारी ती एक शक्ती आहे. प्रभू श्रीरामांच्या जीवनातील करुणेचा हा पैलू या पुस्तकात कुटुंब, समाज, व्यवस्था आणि व्यक्ती अशा चार स्तरांवरून मांडला आहे

स्वागतपर भाषणात डॉ. सच्चिदानंद जोशी म्हणाले की, संस्कृती आणि करुणा यांचा समन्वय झाल्याशिवाय कोणताही मनुष्य परिपूर्ण होऊ शकत नाही. ते म्हणाले, “किमान भारतात तरी संस्कृती आणि करुणेशिवाय परिपूर्ण माणसाची कल्पना आपण करू शकत नाही. करुणा, प्रेम आणि सद्भावना यांचा उदय होऊन ते जगापर्यंत पोहोचले, ती ही भारतभूमी आहे.”

कार्यक्रमाच्या शेवटी प्रभात कुमार यांनी उपस्थित मान्यवर आणि अतिथींचे आभार मानले.

Back to top button