HinduismNews

पंढरीच्या वारीतील हिंदुविरोधी ॲक्टिव्हिजम….

भारतीय संविधानास अभिप्रेत असणाऱ्या सामाजिक समतेची प्रत्यक्षात अनुभुती देणारी आणि बंधुता व सामाजिक न्याय यांचे प्रत्यक्ष दर्शन म्हणजे पंढरीची वारी. शेकडो वर्षांपासून “भेदाभेद भ्रम अमंगल”ही अनुभुती प्रत्यक्ष जीवनात उतरवून, जातीभेद निर्मूलनाचा वसा जपणारा वारकरी संप्रदाय.

महाराष्ट्राचे कौस्तुभ समजल्या जाणाऱ्या विठ्ठलभक्ती संप्रदायाचा अर्थात वारकरी संप्रदायाचा आद्य प्रवर्तक भक्त म्हणजे भक्त पुंडलिक. संत ज्ञानेश्वरांच्या अगोदर वारकरी संप्रदायला वैचारिक अधिष्ठान देऊन पुंडलिकानी या परंपरेला मजबुत केले. दरवर्षी लाखो वारकरी मोठ्या भक्तीभावाने विठुरायाच्या दर्शनासाठी पायी वारी करत पंढरपूरच्या दिशेनं निघतात.

सध्या महाराष्ट्रात पंढरीच्या वारीचीच चर्चा आहे. हजारो कष्टकरी आपल्या शेतीची कामं बाजूला ठेऊन तन्मयतेने विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनाच्या ओढीने दिंडीत चालत असतात.

गेल्या काही वर्षापासून पंढरीच्या या दिंडी सोहळ्यात देवाला न मानणाऱ्या, नास्तिक संघटनांचे पदाधिकारी- सदस्य, हिंदू देवी देवतांना शिवीगाळ करणाऱ्या संघटनांचे अनुयायी, “संविधान समता दिंडी” नावाच्या दिंडीच्या माध्यमातून सहभागी होत आहेत. यामध्ये बंदी घातलेल्या माओवादी संघटनेची फ्रंट संघटना कबीर कला मंच, नक्षलवाद्यांचे समर्थन करणारी लोकायत यांचा समावेश आहे. शामसुंदर सोन्नर यांच्या नेतृत्वाखाली अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्र सेवा दल, आणि समाजवादी संघटना संविधान समता दिंडीच्या माध्यमातून पंढरीच्या वारीत सहभागी होत आहेत.

महाराष्ट्रातील समाजवादी, तथाकथित परिवर्तनवादी संस्था, माओवादी आणि नास्तिक संघटनांमधील कार्यकर्ते मागील १२ वर्षांपासून पंढरपूरच्या वारीत ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ म्हणत सहभागी होतात. यामध्ये प्रमुख्याने महाराष्ट्रातील समाजवादी – मार्क्सवादी विचाराचे  संपादक, साहित्यिक, पत्रकार, शिक्षक, प्राध्यापक, विद्रोही कलावंत यांचा समावेश आहे. संविधानाच्या आडून त्यांचा राजकीय, वैचारिक अजेंडा राबवत आहेत आणि वारीचे पवित्र वातावरण गढूळ करत आहेत.

“पंढरीच्या वारीमध्ये अर्बन नक्षली घुसले” हा विषय शिवसेनच्या आमदार श्रीमती मनीषा कायंदे यांनी विधान सभेत मांडून याविषयी कारवाईची मागणी केली आहे. त्यागोदर तुषार दामगुडे व काही सामजिक कार्य करणाऱ्या संघटना व कार्यकर्त्यांनी “पंढरपूर वारीमध्ये विघातक शक्ती घुसल्यात त्याबाबत हस्तक्षेप करण्याबाबत” पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना निवेदन दिले होते.

मुळात “वारकरी सांप्रदाय”  हा संविधानाच्या गाभ्यात असलेल्या समता, बंधुता, न्याय, स्त्री-पुरुष समानता, जातीभेद निर्मूलन, विज्ञानवादी दृष्टिकोन घेऊन चाललेला सांप्रदाय आहे. पंढरीच्या वारीच्या माध्यमातून शेकडो वर्षांपासून प्रबोधनाचे कार्य अव्याहतपणे सुरु आहे. “भेदाभेद भ्रम अमंगल” हा भाव प्रत्यक्षात जीवनात उतरवून जातीभेद निर्मूलनाचे कार्य करणाऱ्या वारकरी संप्रदायाला ‘टाळकुटे’ म्हणत संतांची हेटाळणी करणारे, देवाला व धर्माला ‘अफूची गोळी’ समजणारे, महिला संतांना फेमिनिजम च्या चळवळीशी जोडायला निघालेले, वारीनिमित्त वारकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी “संविधान समता दिंडीची” काढतात तेव्हा विकृतीकरणाची शंका येते.

वारी करणारा तो वारकरी. वारकरी गळ्यात तुळशीमाळ धारण करतात म्हणुन त्यांना “माळकरी” म्हणून देखिल संबोधित करतात. पंढरीचा पांडुरंग ही या सांप्रदायाची देवता, आणि त्या विठ्ठलाच्या ठायी अखिल वारकरी संप्रदायाची प्रेम जिव्हाळ्याची सारी नाती एकवटलेली आहेत, आपल्या वैयक्तिक संसारात कितीही कामे, कितीही त्रास असला तरी विठ्ठल भक्त त्याच्या भेटीसाठी पंढरीच्या वारीमधे अतुट श्रध्देने सहभागी होत असतो. त्याच वारीमध्ये गळ्यामध्ये तुळशीमाळ नसलेले, देवाला न मानणारे, स्वतःला नास्तिक म्हणवून घेणारे, भगव्याला दहशतवादाशी जोडणारे, संभाजी भगत सारखे विद्रोही कलाकार, अर्बन नक्षल केसमध्ये जामीनावर तुरूंगाबाहेर असलेले शीतल साठे व सचिन माळी सारखे लोक संविधानाच्या नावाखाली वारीमध्ये सहभागी होऊन दिशाभूल करत आहेत.

संविधान समता दिंडीचे चालक श्यामसुंदर सोन्नर धर्माला ‘अफूची गोळी’ मानणाऱ्या मार्क्सवादी पक्षांच्या व्यासपीठावर व मोर्चात, वारकरी संप्रदायाला ‘टाळकुटे’  हिणवणाऱ्या अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यक्रमात वक्ते म्हणून देखील सहभागी असतात.  ‘राम कृष्ण हरी’ हा बीजमंत्र असलेल्या वारकरी संप्रदायाचे प्रबोधन करायला निघालेले श्यामसुंदर सोन्नर ज्यांना रामकृष्णाचे अस्तित्व मान्य नाही अश्या विद्रोही संघटनांच्या कार्यक्रमात देखील असतात. “ज्ञानोबा – तुकाराम, जय जय राम कृष्ण हरी” यासह संप्रदायातील अभंगांचा जयघोष करत निघालेल्या वारीमध्ये हे लोक विद्रोही जलसा आणि चळवळीतील गाणे सादर करत वारकऱ्यांची दिशाभूल करत आहेत.

या संविधान समता दिंडीचे संयोजक अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते अविनाश पाटील, हरिदास तम्मेवार, विशाल विमल हे आहेत. अंनिस चे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी तयार केलेल्या अंधश्रद्धा निर्मुलन विधेयकात “देवांच्या किंवा संतांच्या नावाने अंधानुकरण करण्यावर बंदी घालण्याची मागणी केलेली होती. त्याविरोधात वारकरी संप्रदायाने तीव्र विरोध करत ०६ डिसेंबर २०१२ रोजी आळंदी येथे राज्यस्तरीय वारकरी अधिवेशन भरवले होते. व या कायद्याविरोधात मोठे आंदोलन देखील करण्यात आले होते.

मुळात कीर्तन हे अंधश्रद्धा पसरवणारे थोतांड आहे असे अंनिस चे मत आहे आणि अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याच्या माध्यमातून वारकरी संप्रदायातील भक्तीमार्गावर घाला घालण्याचे त्यांचे षडयंत्र होते, ते वारकऱ्यांनी संविधानिक मार्गाने हाणून पाडले. हिंदू जीवनविचारांतील अध्यात्मिक उन्नतीचा व भगवद्भक्तीतून समर्पणाचा संतमार्ग सांगत अंधश्रद्धा निर्मुलनाचे कार्य करणाऱ्या या पवित्र वारीमध्ये अंधश्रद्धा निर्मुलन समितीला कुठली अंधश्रद्धा घालवायची आहे? की अंधश्रद्धा निर्मुलनाच्या गोंडस नावाखाली वारकऱ्यांची दिशाभूल करत आहेत?

यावर्षी या दिंडीचे प्रस्थान फुलेवाडा येथून झाले जिथे पैगंबर शेख याचाही सहभाग होता, पैगंबर शेख सारख्या व्यक्तीने वारकर्यांचे प्रबोधन करावे हे विलक्षण आहे. ज्या समाजात संविधानाच्या विचारांच्या प्रसाराची खरी गरज आहे ते सोडून हे वारीचे प्रबोधन निघाले आहेत. दहशतवाच्या आरोपाखाली बंदी असलेल्या पीएफआय सारख्या संघटना, अत्याचारी औरंगजेब चे गुणगान करणारे हजारो तरुणांचे प्रबोधन यांनी केले पाहिजे. महिलांना बुरख्यात ठेवणार्या लोकांना यांनी समता, स्वातंत्र्य शिकवायाचे सोडून वारीत प्रबोधन करत आहेत ?

लोकायत हा पुण्यातील एक सामाजिक- राजकीय- सांस्कृतिक मार्क्सवादी कार्यकर्ता गट आहे. पुण्यातील रस्त्यांवर, झोपडपट्ट्यांमध्ये, शाळा, महाविद्यालये आणि विविध सार्वजनिक व्यासपीठांवर विविध उपक्रम आयोजित करतो ज्यामध्ये CAA कायद्याचा विरोध, अयोध्येतील राममंदिराचा विरोध, शहरी नक्षलवाद्यांच्या अटकेकीरोधात आंदोलन यांचा समावेश आहे. रस्त्यावर प्रचार, सार्वजनिक ठिकाणी विद्रोही पथनाट्ये या माध्यमातून फुटीरतावाद्यांचे समर्थन आणि विद्रोही जलशाचे कार्यक्रम सादर करतो. २०१९ च्या निवडणुकीपासून काँग्रेसला सक्रिय पाठिंबा दिला आहे. लोकायत भारत जोडो यात्रेसारख्या काँग्रेसने घेतलेल्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी आहे. वारीमध्ये संविधान समता दिंडी मध्ये अभिव्यक्ती या नावाने सहभाग असतो. 

कोरेगाव हिंसाचारप्रकरणी शहरी नक्षल केसमध्ये अटकेत असलेल्या अरुण परेराने पुणे येथे ‘लोकायत’ या बॅनरखाली बैठक घेतल्याचे तपास यंत्रणाच्या माधमातून समोर आले होते. पुणे मिरर च्या ०५ जून २०१३ च्या बातमीनुसार लोकायत इमारतीच्या परिसरात राज्यातील नक्षलग्रस्त भागातील सुमारे ७० माओवाद्यांची बैठक झाली होती. अहवालानुसार, महिलांसह सुमारे ५० ते ७० लोक बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनी देशातील नक्षलवादी कारवायांवर चर्चा केली, ज्यामध्ये छत्तीसगडमधील घटनेचा समावेश आहे ज्यामध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि इतर २३ जण मारले गेले होते. नक्षलवाद्यांशी संबंध नाकारणारी हीच लोकायत शहरी नक्षलवादाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या वेरनोन गोन्साल्विस, अ‍ॅड. सुधा भारद्वाज, अ‍ॅड. अरूण परेरा, वरावरा राव यांच्या समर्थनात आंदोलनही करते. नक्षलवादाचे आरोप असलेल्यांना पाठीशी घालणारी लोकायत वारीमध्ये सहभागी होऊन नेमक कुठले प्रबोधन करणार आहे ?

शेकडो वर्षांपासून सुरु असलेल्या सुरु असलेल्या व हिंदुंचा गौरवपूर्ण अध्यात्मिक वारसा असलेल्या पंढरीच्या वारीत लाखो वारकरी भक्तीभावाने सहभागी होतात, पांडुरंगाचे नामस्मरण करतात, समतेचा, बंधुतेचा व्यवहार करतात. अशा या समृद्ध परंपरेला गालबोट लावण्यासाठी गेल्या कांही दिवसांपासून ‘सेक्युलॅरिजम’, ‘समाजवाद’ आणि ‘पोलिटिकल ॲक्टिव्हिजम’ घुसडण्याचे प्रयत्न चालले आहेत. वारी हिंदु जीवनविचारांतील अध्यात्मिक उन्नतीचा/ भगवद्भक्तीतून समर्पणाचा संतमार्ग आहे.

वारीत हजारो स्वयंसेवक सेवा करत असतात. शेकडो ठिकाणी लोक उत्स्फूर्तपणे तोरणं, कमानी उभारून वारीचं स्वागत करतात. मात्र गेले काही दिवस मिडियातून केवळ मशिदीसमोर वारीचं कसं स्वागत झालं, मुस्लिम बांधवांनी ‘सरबत वाटप’ कसं केलं. याच्याच ठळक बातम्या येताहेत! ( हे कव्हरेज आपोआप मिळत नसतं. ते प्रयत्नपूर्वक व ठरवून केलेलं असतं!). परवा- परवापर्यंत ‘टाळकुटे’ म्हणून संतांची हेटाळणी करणारे, देवाला व धर्माला ‘अफूची गोळी’ समजणारे देखील महिला संतांना फेमिनिजम च्या चळवळीशी जोडायला वारीनिमित्त मेळावे घेतात तेंव्हा या विकृतीकरणाची शंका येते.

संविधानाच्या आडून वारीला वैचारिक, राजकीय आखाडा करू पाहणाऱ्या वारीचे पावित्र्य गढूळ करू पाहणाऱ्या समाजवादी, मार्क्सवाद्यांचा समस्त वारकऱ्यांनी, महाराजांनी व समाजाने बुरखा फाडणे आवश्यक आहे.

तुका म्हणे ऐशा नरा। मोजुनी माराव्या पैजारा॥

लेखक :- आप्पासाहेब पारधे

Back to top button