वीरगळ, ऐतिहासिक वारसा स्थळांचा अभ्यास करणारा शेतकरी
सह्याद्रीचे उंचच उंच कडे, विस्तीर्ण पसरलेले समुद्रकिनारे, सतत वाहत्या नद्या यामुळेच सुपीक जमीन. या प्रदेशात शेतीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. भारतीय शेतकरी आपल्या शेतात फार मेहनत घेतो, मग त्याच्या कष्टाळू हातांची किमया भुईमधून उमलून येते. साताऱ्याजवळील खिंगर येथे एका लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात अनिल दुधाणे यांचा जन्म झाला.
अनिल दुधाणे यांनी विज्ञान विषय घेऊन बारावीनंतर आयटीआय पूर्ण केले. त्यानंतर त्यांचे अभियांत्रिकीचे शिक्षणही झाले. त्यांनी महाराष्ट्र, गुजरात तसेच राजस्थानमधील गडकिल्ले पाहिले व इतिहासाचा अभ्यास केला. त्याचबरोबर जर्मन शेतकऱ्यांशी विचारविनिमय करून शेतकी विषयातील नवं तंत्रज्ञान वापरून त्याचे प्रयोग आपल्या शेतीत केले. तसेच त्यांनी वीरगळ व सतीशिळा या विषयांवर अनेक प्रबंध लिहून त्यांचे जाहीर वाचनही केले आहे.
इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करुन ते नोकरीही करू लागले. परंतु गड-किल्ल्यांची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. सुट्टीच्या दिवशी किल्ले पाहता पाहता त्यांनी संपूर्ण सह्याद्री पिंजून काढला. विदर्भातले काही किल्ले सोडले तर त्यांचे महाराष्ट्रातील सर्व किल्ले पाहून झाले आहेत. महाराष्ट्रातील किल्ल्यांची एकूण संख्या ३९८ आहे. त्यापैकी अनिल दुधाणे यांचे ३८५ किल्ले पाहून झाले आहेत. तसेच राजस्थानमधील २३० किल्ल्यांचा आणि गुजरातमधल्या ११८ किल्ल्यांचा अभ्यास झाला आहे तसेच मध्यप्रदेशातीलही २०० च्या आसपास किल्ल्यांचा अभ्यास त्यांनी केला आहे.
ही किल्ल्यांची भटकंती सुरु असताना त्यांची प्रमोद मांडे यांच्याशी भेट झाली. या भेटीने त्यांचा किल्ल्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनच बदलून गेल्याचे ते सांगतात. एखादी भेट आपला दृष्टिकोन बदलू शकते तसंच एखादा विशिष्ट दृष्टिकोन आपले आयुष्य बदलू शकतो. किल्ल्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, भौगोलिक परिस्थितीनुसार किल्ल्याचे स्थान, शत्रूच्या आक्रमणाच्या दृष्टीने केलेली किल्ल्याची बांधणी, एखाद्या बुरुजाची व तटबंदीची बांधणी किंवा प्रवेशद्वार कोणत्या एका बाजूलाच का तसेच प्रवेशद्वाराचे प्रकार या व अशा अनेक क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टी त्यांच्या लक्षात येऊ लागल्या. यापुढे किल्ले बघताना त्यांचा खऱ्या अर्थाने अभ्यास सुरु झाला. त्याचबरोबर त्यांना काही शिल्प किल्ल्यांवर सापडली. काही पायथ्याशी, काही गावात, जी पूर्णपणे दुर्लक्षित होती. एखादी बारव, एखादा पुरातन अवशेष, काही जुन्या बांधणीच्या पडक्या वास्तू, जुनं मंदिर किंवा फुटलेली मूर्ती. हे सर्व शोधताना अनिल यांनी सहज म्हणून त्यांचे फोटो घेऊन ठेवले होते.
अशा बऱ्याच शिल्पांचे फोटो सापडल्यानंतर त्यांच्या एका मित्राला त्यांनी विचारले या शिल्पांचा अर्थ काय आहे? तोपर्यंत त्यांना वीरगळ म्हणजे काय हे माहिती नव्हते. वीरगळचे प्रकार व अर्थ त्यांना त्याच्या मित्राने समजावून सांगितले. त्यात किती तथ्य ते मात्र अजूनही सांगता येत नाही. गावासाठी महत्वाचं काही काम करून किंवा लढून ज्याचा मृत्यू झालेला आहे अशा व्यक्तींना वीरत्व प्राप्त होतं आणि त्याची दगडात कोरून मूर्ती बनवली जाते, त्यास वीरगळ असे म्हणतात. वीरगळ एकमेकांपासून वेगळी कशी असते हे पाहताना त्यांनी वीरगळचे वेगवेगळे प्रकार शोधायला सुरुवात केली. हे करतानाच त्यांना फक्त महाराष्ट्रात ४० प्रकारच्या विविध वीरगळ पाहायला मिळाल्या. ज्यात आई आणि तिचा लेक अशी वीरगळ असते, प्राण्यांची वीरगळ असते, पक्षी आणि त्याचबरोबर लढाईतल्या घटनांचेसुद्धा वीरगळ पाहायला मिळतात. गावासाठी किंवा राज्यासाठी ज्यांनी बलिदान दिले आहे अशांचेसुद्धा वीरगळ पाहायला मिळतात. वाघाशी लढताना झालेला मृत्यू आणि त्यामुळे बनवली गेलेली वीरगळ, स्त्रिया व पुरुष यांची वीरगळ किंवा मुष्टियुद्ध खेळत असलेल्या पुरुष व स्त्रियांची वीरगळसुद्धा सापडल्या आहेत. तसेच गद्धेगळ हा एक प्रकार असतो ज्यात शापवाणी असते. यातून त्यांना असे समजले की स्त्रियांच्याही पूर्वीच्या काळी एकमेकांशी लढाया होत असत. या वीरगळचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी जवळपास ९०० गावांना भेट दिली. त्यानंतर ५ दिवसांचे दौरे आखून वीरगळ डॉक्युमेंटेशन मोहीम सुरु केली, प्रत्येक जिल्ह्यात दौरा आखून दिवसाला सरासरी चाळीस गावे पाहत, प्रत्येक गावातील वीरगळ शोधून ती धुवून त्याची छायाचित्रे घेत. त्यांनी एक ‘इतिहासाचे मूक साक्षीदार वीरगळ आणि सतीशिळा’ नावाचे पुस्तकसुद्धा लिहीले.
पुढील काळात त्यांनी शिलालेख वाचायला सुरुवात केली. त्यांचा अभ्यास करून अहवाल तयार करुन प्रसिद्ध केले. त्यांनी असे जवळपास ८० शिलालेख प्रसिद्ध केले. यातून त्यांनी प्रबंध लिहिण्यास सुरुवात केली. एका वर्षात त्यांनी असे १३ ते १४ प्रबंध प्रकाशित केले. हे सारे करत असताना त्यांनी एकही दिवस कार्यालयीन कामासाठी सूट घेतली नाही हे विशेष. याबरोबरच गावी मेहेनत घेणाऱ्या शेतकऱ्यांचे कष्ट त्यांच्या नजरेसमोर होतेच. आपल्या शिक्षणाचा उपयोग त्यांनाही काही व्हावा असे विचार वरचेवर अनिल यांना सतावू लागले. त्यांच्या असे लक्षात आले की इथली जमीन सुपीक, कसदार, शेतकरी पण कष्टाळू परंतु त्याच्या कष्टांची फळे मात्र आपल्याला इतर देशातील शेतकऱ्यांपेक्षा कमी मिळतात. मग विदेशातील शेतकऱ्यांशी वार्तालाप करून त्यांनी अनेक क्लुप्त्या शिकून घेतल्या. माती विरहित शेती, सह्याद्रीच्या वातावरणात स्ट्रॉबेरी पिकाचे उत्पन्न घेतले, तसेच त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले.
शाळेतून किंवा कामावरून घरी आल्यावर त्यांना लगेचच शेतात काम करण्यासाठी जावे लागे, तर शनिवार-रविवारच्या दिवशी पूर्ण दिवस शेतात काम करावं लागे. इतर मुलांसारखे त्यांना सुट्टीचे दिवस खेळण्यात मौजमस्ती करण्यात घालवता आले नाहीत. आईवडील फार मेहनत घेत ती सतत डोळ्यापुढे असे. मुंबईत नकरीसाठी आल्यावरही आईबाबांची मेहनत डोळ्यापुढून जात नव्हती. फक्त ५% पाऊस पडून इस्रायल शेती उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर आहे मग आपल्या इथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस, तुडुंब वाहणाऱ्या नद्या तर आपल्याकडे शेती का होत नाही? एकूण परिस्थिती, वातावरण, मातीचा अभ्यास करून झाल्यावर त्यांनी स्वतः काही मॉडेल्स तयार केले. ज्यायोगे शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात कमी वेळेत आणि किमान मेहेनत घेऊन जास्त उत्पन्न घेता येईल.
गावातील सगळ्या शेतकऱ्यांना प्रयोग करून दाखवले आणि नव्या पद्धती दाखवून दिल्या. ज्या ज्या भागात आपण भातशेती करतो त्या त्या भागात आता सगळ्या प्रकारची पिके घ्यायची असे शेतकऱ्यांना सांगितले. स्ट्रॉबेरी, मलबेरी, ड्रॅगन फ्रुट, ब्रुसबेरी, इत्यादी पिकांचे यशस्वी प्रयोग करून ते उत्पन्न घेत आहेत. तसेच हे तंत्रज्ञान आपल्यापुरते मर्यादित न ठेवता त्यांनी गावातील सर्व शेतकऱ्यांना शिकवले. मातीविरहित शेती करून शेतकऱ्यांचा वेळ तसेच मेहेनत कमी करून उत्पादन वाढवण्यास मदत केली. मातीविरहित शेती तंत्रज्ञानात स्ट्रॉबेरीचे पीक घेण्याच्या कामगिरीमुळे त्यांना सहा पुरस्कार प्राप्त झाले आहेत. कृषी किमयागार पुरस्कार, समृद्ध किसान पुरस्कार, मी मराठी पुरस्कार, सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार, फिनोलेक्स कृषी पुरस्कार, सह्याद्री कृषिरत्न पुरस्कार, राज्यस्तरीय सह्याद्री कृषी व सामाजिक पुरस्कार त्याचबरोबर शेती आणि इतिहास क्षेत्रात संशोधन केल्याबद्दल सातारा भूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या शेती तसेच इतिहास विषयांतील कार्यासाठी साप्ताहिक विवेककडून अनेक शुभेच्छा!
लेखिका – मृगा वर्तक
सौजन्य : सा. विवेक