HinduismRSS

संघ शाखांतील स्वातंत्र्यदिन सोहळा(लेखमाला – विश्वगुरु भारत – भाग 11)

संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि त्यांचे निकटचे सहकारी अप्पाजी जोशी हे ज्येष्ठ सदस्य म्हणून काँग्रेसच्या मध्यभारत प्रांत समितीत कार्यरत होते. तेथे सर्वच महत्त्वाच्या दस्तावेजांचे मसूदे तेच तयार करीत. त्या काळात ब्रिटिश प्रशासनाने भारतीय सैन्य चीनमध्ये तैनात करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या विरोधात डॉ. हेडगेवार यांनी एका जाहीर सभेत एक प्रस्ताव मांडला, जो उपस्थितांनी एकमताने संमत केला. “भारतीय नागरिकांचा कोणत्याही प्रकारच्या लष्करी कारणासाठी वापर करण्याच्या सर्व प्रकारच्या प्रयत्नांचा ही सभा एकमुखाने निषेध करीत आहे आणि अशा कोणत्याही हालचालींचा न्याय्य मार्गाने विरोध करण्याचे आणि त्याबाबत सरकारकडे निषेध नोंदविण्याचे आवाहन भारतीय नागरिकांना करीत आहे.”

सायमन कमिशनला विरोध आणि क्रांतिकारकांना सहाय्य पाठिंबा

१९२८च्या दरम्यान ब्रिटनच्या राणीकडून एक आयोग सुधारणांचा संच घेऊन भारतात आला. सायमन  यांच्या नेतृत्वाखालील या आयोगाला देशभरात विरोध झाला. सायमन कमिशनचा झालेला निषेध अभूतपूर्व होता. मध्यप्रांत आणि शेजारच्या परिसरातील आंदोलनांचे मार्गदर्शक व नियंत्रक डॉ. हेडगेवार होते. बनारस येथे झालेल्या काँग्रेसच्या सभेत संप आणि निषेधाबाबत सर्व निर्णय घेतले गेले. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी डॉक्टरांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली. स्वयंसेवकांचा एक मोठा गट आणि त्यांचे समर्थक हे सायमन कमिशनच्या विरोधात सहभागी झाले. संघटनात्मक संलग्नता दूर सारून काँग्रेसने केलेल्या चळवळींमध्ये स्वयंसेवकांनी आपला सहभाग कायम ठेवला होता.

लाहोरमधील आंदोलनाचे नेतृत्व लाला लजपतराय यांनी केले. सायमन कमिशन परत जा आणि परदेशी प्रशासन मुर्दाबाद या घोषणांनी लाहोर रेल्वे स्थानक दुमदुमून गेले. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आंदोलकांना क्रूर पद्धतीने मारहाण केली. त्यात लाला लजपतराय यांना गंभीर दुखापत झाली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सरदार भगत सिंह आणि राजगुरू यांनी या क्रूर लाठीमाराला कारणीभूत असलेल्या पोलीस अधिकारी सँडर्स याला गोळ्या घालून ठार केले आणि नंतर हे दोघे क्रांतिकारक लाहोरमधून गायब झाले. राजगुरू नागपुरात येऊन डॉक्टरांना भेटले. राजगुरू हे डॉक्टरांचे निकटवर्तीय होते. त्यांच्या राहण्याची व भोजनाची सोय डॉक्टरांचे जवळचे सहकारी भय्याजी दाणी यांच्या शेतघरावर करण्यात आली. राजगुरू हे पुण्यास घरी परत गेले तर त्यांना अटक होऊ शकते असा इशाराही देण्यात आला.  

राजगुरूंनी इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले व पुण्यातील आपल्या घरी गेले. त्यांना अटक करण्यात आली व सरदार भगत सिंह आणि सुखदेव यांच्यासह त्यांच्यावरही आरोप ठेवण्यात आले. या तीनही क्रांतिकारकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली व फासावर लटविण्यात आले. स्वाभाविकच डॉ. हेडगेवारांना अतीव दुःख झाले. पण, त्यांना हे अनपेक्षित नव्हते. या तिघांचे समर्पण वाया जाता कामा नये असे त्यांनी आपल्या मित्रांना सांगितले. संघातील त्यांच्या व्यस्त दिनचर्येतही सशस्त्र क्रांतिकारकांबद्दल त्यांना वाटणारी सहानुभूती, काळजी आणि त्यांच्यासोबतचा सहभाग कायम राहिला. डॉक्टरांचे त्यांना विविध प्रकारे मदत करणे सुरूच राहिले.

सर्व संघशाखांनी साजरा केला स्वातंत्र्य दिन

ऍलन ऑक्टाव्हिअन ह्यूम यांनी स्थापन केलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने स्थापनेपासून म्हणजे १८८५ पासून १९२९ पर्यंत कधीही संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी कधीही केली नाही हे एक ऐतिहासिक सत्य आहे. वसाहतवादी ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य (स्वातंत्र्य नव्हे) या संकल्पनेपुरती कॉंग्रेस सीमित झाली होती. परंतु, लाहोरमध्ये १९२९च्या डिसेंबर महिन्यात झालेल्या राष्ट्रीय महासभेत संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाला. डॉ. हेडगेवारांनी याचे जाहीर स्वागत केले. नेहरूंनी २६ जानेवारी १९३० रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करण्याच्या केलेल्या आवाहनाबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी डॉक्टरांनी देशभरात, विशेषतः संघशाखांवर हा दिवस साजरा करण्याच्या सूचना दिल्या.  

देशभरात काँग्रेस आणि रा. स्व. संघाने स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा घेतलेला निर्णय हा ऐतिहासिक दस्तावेज झाला. देशभरातील शाखांना पाठविलेल्या पत्रात डॉ. हेडगेवार लिहितात, यावर्षी काँग्रेसने भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याचे लक्ष्य ठेवले आहे आणि २६ जानेवारी १९३० रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करणार असल्याचे जाहीर केले आहे. प्रत्येक संघशाखेने त्या दिवशी सर्व सूचनांचे पालन करत, संध्याकाळी सहा वाजता जाहीर सभा घेऊन हा दिवस साजरा करावा. शाखांमध्ये होणाऱ्या बौद्धिकांमध्ये संपूर्ण स्वातंत्र्य आणि त्याचे उद्देश स्पष्ट केले जावेत. काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्य आणि त्याचे उद्देश मान्य केले आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचा या सभांमध्ये सत्कार केला जावा.

या सर्व सूचनांनंतर संघाच्या कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. २६ जानेवारी १९३० रोजी भगव्या ध्वजासमोर प्रार्थना करत कार्यक्रमांना सुरुवात झाली. त्यानंतर राष्ट्रीय आणि देशभक्तीपर गीते गायली गेली. पथसंचलन करण्यात आले. प्रत्येक शाखेत संपूर्ण गणवेशात आणि समाजातील आदरणीय व्यक्तींच्या उपस्थितीत हा दिवस साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे भाषणांमध्ये संपूर्ण स्वातंत्र्यासाठी शेवटपर्यंत संघर्ष करण्याची प्रतिज्ञा करण्यात आली.

अनेक हिंदू संघटना संघात सामावल्या

स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाल्याची काही सुखद फलितेही मिळाली. संघ शाखांतील स्वयंसेवक आपली ओळख फक्त स्वयंसेवक एवढीच मर्यादित ठेवत असले तरीही देशप्रेम, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठा या मूल्यांमुळे स्वातंत्र्य चळवळीत कार्यरत अन्य संघटनांमध्ये ते चमचमत्कया हिऱ्यांसारखे उठून दिसत. अकोल्यात हिंदू युवकांसाठी ‘अखिल महाराष्ट्र तरुण युवा अधिवेशन’ संपन्न झाले. हिंदू समाजात पुनर्जागृती करण्यासाठी घेण्यात आलेल्या या अधिवेशनास मध्य प्रांतातील हिंदू नेत्यांनी समर्थन/शुभेच्छा दिले. डॉ. हेडगेवार हे देखील काही संघ अधिकाऱ्यांसह तिथे पोहोचले. या अधिवेशनात डॉक्टरांचे शिवाजीराव पटवर्धनस मसूरकर महाराज यांसारख्या नेत्यांशी संघाची विचारधारा, कार्यपद्धती आणि ध्येय याविषयी सविस्तर चर्चा झाली. डॉक्टर त्यांना म्हणाले की विविध संघटनांमधील कार्यकर्तेही आपल्या संघटनेसाठी काम करताना संघाच्या शाखेत येऊन प्रशिक्षण घेऊ शकतात. या सर्व नेत्यांशी डॉक्टरांच्या निकट आणि चांगल्या संबंधांचा नजिकच्या काळात चांगला परिणाम दिसून आला.

या अधिवेशनात सहभागी झालेले अनेक तरुण शाखेत येऊ लागले. अनेक नेत्यांना संघाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले. ज्येष्ठ कार्यकर्त्यांपैकी एक, मुक्तेश्वर दलाचे नेते श्री पाचलेगावकर यांचाही त्यात समावेश होता. संघाची कार्यपद्धती व ध्येय याने भारावून त्यांनी आपले दल संघात विसर्जित केले. डॉ. हेडगेवार यांचे नेतृत्वगुण आणि व्यक्तिनिरपेक्ष कौशल्ये यामुळे प्रभावित झालेल्या अनेक छोट्यामोठ्या संघटनांमधील तरुणांनी संघाशी जोडले गेले.

संघशाखांच्या सतत सुरू असलेल्या विस्तारामुळे विशेषतः तरुणांत संघाशी जोडले जाण्याच्या वाढत्या आकर्षणामुळे ब्रिटिश अधिकारी सतर्क झाले होते. त्यांनी उच्च अधिकाऱ्यांना संघाच्या कार्याबद्दल अहवाल देण्यास सुरूवात केली. या अहवालांमध्ये डॉ. हेडगेवार यांचा उगवता हिंदू नेता असा उल्लेख करत स्वातंत्र्य चळवळींबाबत स्वयंसेवकांना असणारी निष्ठा याबाबतची माहिती देण्यात आली होती.

Back to top button