Opinion

शहराकडे येता-येता गावची वाट केंव्हा दूर जात राहते तेच कळत नाही

आज संध्याकाळी कॉलेजमधून बाहेर पडलो जरा थकवा जाणवत होता आणि त्यासाठी चहाचा शोध घेत होतो. येणाऱ्या रस्त्यावर तशा म्हटल्या तर तीन-चार चहाच्या टपऱ्या लागतात. त्यातली भोसला मिलिटरी स्कूलच्या गेट जवळची एक टपरी माझ्या परिचयाची. कधीकधी सकाळी जावं लागतं अशावेळी ही चहाची टपरी माझ्या उपयोगाला पडणारी. आज ही टपरी नजरेस नाही पडली. तिथे सायकलवर एकजण चहा विकत होता. सहज विचारपूस करायची म्हणून विचारलं की काय झालं? अतिक्रमणामुळे स्त्यावरच्या या छोट्या छोट्या टपर्‍या आता नाहीशा झाल्या होत्या. त्यातल्या काही अडचणीच्या वाटत होत्या. पण नियम सगळ्यांना सारखा असतो. आज कुठलीच टपरी जेहान सर्कल पासून ते महात्मानगर पर्यंत नजरेस पडणार नाही असे त्यांनी सांगितलं.

माझ्या मनात प्रश्न आला आणि मी विचारलं किती वर्षापासून या चहाच्या टपरीत व्यवसाय करत होतात त्यांनी सांगितलं गेली २६ वर्षे या ठिकाणी मी चहाची टपरी चालवत होतो. १९९१ साली रोजगाराच्या शोधात विदर्भातील अकोला भागातून नाशिकच्या बांधकाम व्यावसायिकाकडे कामाला लागलो. त्यानंतर त्याच बांधकाम व्यावसायिकाकडे सुरक्षारक्षक म्हणून काम करत राहिलो. धंदा करावासा वाटला आणि चहाची टपरी टाकली. सुदैवाने गेल्या सव्वीस वर्षे व्यवसाय सातत्याने चालू ठेवता आला. आता टपरी नाही सायकलवर चहा वाटत फिरतो. पारिजात नगरच्या जवळच्या चौकात महानगरपालिकेने टपरी साठी जागा दिली होती पण एका दिवसातच तिथल्या सर्व टपऱ्या पुन्हा महानगरपालिकेने उचलून नेल्या.

रस्त्यावरची झाडी गेली. अतिक्रमणे गेली. पार्किंगसाठी मोठी जागा आता उपलब्ध व्हायला लागली. याबरोबर अनेक छोटे छोटे व्यावसायिक संपुष्टात आले. शहर सुंदर दिसावं स्वच्छ दिसावे यात खरं तर कोणाचाच आक्षेप असण्याचे कारण नाही पण विकासाचा एक साधा सुंदर सोपा समतोल साधण्याची पण आवश्यकता आहे. काळाच्या ओघात काही रोजगार संपूर्णपणे संपुष्टात येतात. माझं मत अतिक्रमणाच्या विरोधात आहे त्याचं समर्थन करण्याची व्यक्तिगत आणि सार्वजनिक इच्छा नाही. पण शहराच्या वाढत्या विकासाबरोबर सामान्यातील सामान्य माणसाची काळजी घेता येईल, रोजगार सुरक्षित राहील एवढी नक्की व्यवस्था शहराच्या मनात आकार धारण करायला हवी.

शहराच्या विकासाचा परिमाण म्हणून अवैध बांधकाम अतिक्रमण आणि दुर्दशा थांबवायलाच हवी. पण या शहराच्या रोजच्या धावपळीच्या जगात अशा अनेक छोटे उद्योग आहेत ते आपलं पालनपोषण करत असतात. सामान्य कामगारवर्ग, कामानिमित्त फिरणारा माणूस अशा स्वस्तात मिळणार्‍या पर्यायाच्या शोधात रस्त्याच्या आजूबाजूला काहीतरी शोधत असतो. इतके दिवस त्याची ती गरज पूर्ण होत होती यापुढे ती गरज कशी पूर्ण होणार आहे प्रश्नचिन्ह आहे. मुळात पोटासाठी छोट्या छोट्या व्यवसाय करण्याची प्रेरणा कुठला ना कुठला मार्ग नक्की शोधून काढतील या बाबतीत शंका नाही.

या शहरातील हातावर पोट असणारी अनेक माणसे अर्थकारणाच्या एका विचित्र चक्रात अडकली आहेत. कधीकधी वाटतं की हे एखादे मोठे षडयंत्र आहे अव्वाच्या सव्वा व्याजदराने रकमा या शहराच्या मध्यभागी किंवा कोपऱ्यात असणाऱ्या वस्तीत देण्याची विचित्र प्रथा आहे. पुरेशा प्रमाणामध्ये आर्थिक साक्षरता या घटकाचे नक्की झाली नाही. शहरात बँकांचे जाळे मोठे असून सुद्धा इथपर्यंत पोहोचल्या नाही. छोट्या पतसंस्था यात काम करताना दिसतात. येथील काम करणारी माणसे, स्रिया ज्यांच्याकडे काम करतात त्यांनाही अजून पर्यंत ह्याचा अर्थकारणाविषयी फारशी चिंता पडलेली नसते. महिला बचत गट आहेत पण खरच किती प्रमाणामध्ये सक्षमीकरण झालं आहे हे प्रश्नच आहे. येथील तरुण अजूनही नोकरीच्या शोधात, अस्थिरतेच्या वातावरणात शहराच्या भोवती घिरट्या घालत असतो. यातला काही कळत नकळत गुन्हेगारीकडे ही ओढला जातो. त्यातला काही चुकीच्या राजकारणाच्या भोवती आशेचा किरण शोधत असतो. विचित्र गणित आहे.

ग्रामीण भागातून रोजगारासाठी येणारा एक मोठा वर्ग दिवसेंदिवस शहराच्या उंबरठ्यावर येऊन थांबतो आहे. त्याची अपेक्षा, आशा आहे. भविष्य याविषयीची काही स्वप्न आहेत. खर तर रोजगाराचे विकेंद्रीकरण व्हायला हवे. पण विकासाचे सर्व केंद्रबिंदू मोठ्या शहराच्या भोवती येऊन थांबतात. सहापदरी रस्ता वेगाने धावणारी गाडी दोन शहरात झालेला कमी अंतर वेगळ्या अर्थाने अनेक नवीन प्रश्न निर्माण करतात असे कधी कधी वाटतं. शहराकडे येता-येता गावची वाट केंव्हा दूर जात राहते तेच कळत नाही.

Back to top button