NewsRSSSeva

हिंदू सारा एक,
तळजाई शिबिर संस्मरण

एखाद्या राष्ट्रव्यापी सामाजिक संघटनेच्या शतकपूर्तीकडे जाताना त्याच्या प्रगतीच्या मधल्या टप्प्यांचा विचार केला जातो. २५-५०-७५ वर्षे हे त्यासाठी टप्पे असू शकतात. तसेच काही महत्त्वाचे कार्यक्रम अथवा परिवर्तन झालेल्या विशिष्ट कालखंडाचा विचार करावा लागतो. त्यात काही दीर्घ पूर्वतयारीच्या कार्यक्रमांचाही समावेश होतो.

देशाच्या इतिहासात १९९० च्या दशकातील हिंदू जागृतीचे पर्व महत्वाचे आहे. त्यात १९८० नंतरच्या दशकाचे विशेष महत्व आहे. तामिळनाडूतील मीनाक्षीपुरम येथे सर्व गाव धर्मांतरीत झाले. देशाला खडबडून जाग आली. तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनाही यावर चिंता व्यक्त करावीशी वाटली.

विराट संघ शक्तीचे प्रकटीकरण
त्यानंतर हिंदू जागृतीचे विशाल स्वरूपाचे व प्रचंड संख्येचे अनेक कार्यक्रम देशभर झाले. देशहितासाठी हिंदुत्वाच्या आधारावर समाजाचे संघटन करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघा च्या वाटचालीत असे काही मोठे टप्पे आहेत. १९७५ च्या आणीबाणी सारख्या पाशवी दमनशाहीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चिरडून टाकण्याचे प्रयत्न झाले. परंतु या अग्निपरीक्षेतून संघ केवळ तळपून उठला नाही, तर या पाशवी सत्तेस समाजाच्या सहभागाने लोकतांत्रिक पद्धतीने पराभूत करून या देशाला दुसरे स्वातंत्र्य देखील मिळवून दिले.

१९८० च्या दशकात महाराष्ट्र प्रांतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचा एक प्रत्यक्ष अविष्कार समाजाला घडवावा आणि त्यासाठी कार्यकर्त्यांनी सुयोग्य पद्धतीने पूर्वनियोजन करून याचे म्हणजेच आपल्या विराट सामूहिक शक्तीचे प्रकटीकरण घडवावे असे एक ध्येय तत्कालीन प्रांतसंघचालक कै. बाबाराव भिडे यांनी संघ
स्वयंसेवकांसमोर ठेवले.प्रांतापासून ते तालुकास्तरापर्यंतच्या सर्व संघ कार्यकर्त्यांनी आपल्या नेतृत्वाच्या या आवाहनाला प्रचंड परिश्रमांची साथ देऊन हे विराट संघ दर्शन समाजाला घडविले. यात समाजाला “हिंदू सारा एक” ची अनुभूती जाणवली.

हिंदू सारा एक
प्रतिभावंत स्वयंसेवक व भारतीय जनता पक्षाचे आमदार राहिलेले ज्येष्ठ स्वयंसेवक कै. डॉ.अरविंद लेले यांनी अत्यंत सुगम व सोप्या शब्दात या सर्व वाटचालीचे व भविष्यातल्या पथदर्शनचे एक ध्येयगीत या शिबिरासाठी रचले. कवीच्या प्रतिभेची व त्याच्या हृदयातील असलेल्या ध्येयवादाची अत्यंत उत्कट अशी ही अशी ही पद्धत पद्य गीत रचना होती…

“हिंदू सारा एक मंत्र हा
दाही दिशांना घुमवू या |
धरती नभ पाताळ ही भारू
प्राण पणाला लावू या ||”

यात हिंदू संघटनेने केलेल्या वाटचालीचे दर्शन होते. तसेच पुढील वाटचालीचे मार्गदर्शन देखील होते. सामान्य माणसाला आश्वस्त करणारे हिंदू संघटनेचे अभिवचन या गीतात व्यक्त झालेले आहे. या गीताला अनुसरून संघाच्या कार्यकर्त्यांनी संघटनेसाठी घेतलेले परिश्रम व ज्या ध्येयासाठी संघटन कटीबद्ध आहे, त्याचा प्रत्यक्ष जमिनीवरील अविष्कार या प्रांतिक शिबिराने घडवला.

डॉ हेडगेवार यांचे स्वप्न
पुणे शहरातील तळजाई पठारावरील(taljai shibir/camp)मकर संक्रमणाच्या(makar sankranti) पार्श्वभूमीवर १४-१५-१६ जानेवारी १९८३ या कालावधीत ३५,००० स्वयंसेवकांचे तीन दिवसीय निवासी एकत्रिकरण “तळजाई प्रांतिक शिबिर” म्हणून ऐतिहासिक झाले. त्यातील विविध शारीरिक व बौद्धिक कार्यक्रम यातून संघटनेच्या ध्येय चिंतनाची आठवण करून देण्यात आली. तसेच भविष्यातील आव्हानांवर मात करून परिश्रमांच्या आधारावर संघसंस्थापक पूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्वप्नातील राष्ट्राचे स्वरूप प्रकट करण्यासाठी कटिबद्ध होण्याचे स्मरण करण्यात आले.

पस्तीस हजार स्वयंसेवकांचे विविध तुकड्यांमधून व विविध मार्गांवरून निघालेले पथसंंचलन एका विशिष्ट वेळेला विशिष्ट ठिकाणी अचूकतेने एकत्र आले. हिंदू समाज अनुशासनात बांधला जाऊ शकतो याचे प्रकटीकरण समाजाचा आत्मविश्वास वाढविणारे ठरले.

पुणेकरांचे आतिथ्य
मकरसंक्रांत हा पर्यावरणीय बदलाचा एक सण अथवा उत्सव म्हणून समाजात रूढ आहे. सूर्याचे उत्तरायण हे त्याला निमित्त असते. या मकर संक्रमणाला पर्यावरणीय महत्त्वाच्या दृष्टीने तिळगुळ देण्याचे महत्त्व आहे. हे शिबिर संक्रांतीच्या पवित्र पर्वावर घेतलेले असल्याने स्वाभाविकच
प्रातिनिधिक व पारंपरिक गुळाच्या पोळ्यांचा भोजनात समावेश करणे निश्चित झाले. परंतु या पुणे(pune) शहरामध्ये महाराष्ट्रातील खेडोपाड्यातून सामान्य स्वयंसेवक एकत्र येणार आहेत, त्याला आपल्या आतिथ्याचा पुणेकरांनी लाभ देऊन “हिंदू सारा एक” हा संदेश देण्याची कल्पना अभूतपूर्व होती. पुणे महानगरातील हजारो घरांमधून गुळांच्या पोळ्यांचे संकलन करण्यात आले. कष्टकरी-मध्यमवर्गीय-उच्च मध्यमवर्गीय-श्रीमंत अशा सर्व स्तरातून राहणाऱ्या पुण्यातील विविध समाज बांधवांनी आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्याचे ज्या आत्मीयतेने स्वागत केले जाते,त्याच आत्मियतेने गुळांच्या पोळ्यांचे भरभरून संकलन आपल्या घराजवळच्या केंद्रात करून दिले.

मान्यवरांची मांदियाळी
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, प्राचार्य शिवाजीराव भोसले, “मृत्युंजय”कार लेखक शिवाजी सावंत,स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पू.पांडुरंगशास्त्री आठवले, गीतरामायण गायक व संगीत दिग्दर्शक सुधीर फडके अशा अनेक मान्यवरांच्या शिबिरातील उपस्थितीने “हिंदू सारा एक”च्या दृढनिश्चयाचा संकल्प विशिष्ट उंचीवर गेला.”स्वामी” व “श्रीमान योगी” कादंबरी लेखनाने घराघरात पोहोचलेले प्रख्यात साहित्यिक रणजीत देसाई यांनी तर व्यासपीठावरून संघटनेबद्दल बद्दलच्या आपल्या कृतार्थ भावना व अपेक्षा व्यक्त केल्या.

हिंदू संघटन व सामाजिक समता
१९७३ मध्ये सरसंघचालक पदाची धुरा स्वीकारल्यावर पू. बाळासाहेब देवरस यांनी १९७४ च्या पुणे येथील वसंत व्याख्यानमालेत येथील वसंत “हिंदू संघटन व सामाजिक समता” या विषयावर अत्यंत निःसंदिग्ध शब्दात समतेवर आधारलेले हिंदू संघटन संघाला अपेक्षित असल्याची ग्वाही दिलेली होती. त्याचाच आविष्कार पुन्हा एकदा विराट संघशक्तीला व उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना त्यांच्या भाषणाने घडला. “समतायुक्त व विषमतारहित हिंदू समाजाचे स्वप्न” हिंदू संघटन म्हणून आम्ही पहात असल्याचे अत्यंत सुस्पष्ट शब्दात त्यांनी विशद केले.
शेतकरी,कामगार,व्यापारी,मजूर,
कष्टकरी,उद्योजक तसेच ग्रामीण-शहरी अशा सर्व स्तरातून आलेल्या
स्वयंसेवकांनी आपल्या विराट संघ शक्तीचे दर्शन हृदयात साठवून ठेवले. भविष्यातील “हिंदू सारा एक” या संघटनेला अपेक्षित असलेल्या वाटचालीसाठी कटिबद्ध होऊन हे पाथेय आपल्याबरोबर घेऊन स्वयंसेवक आपापल्या गावी परतले.या शिबिरातील संख्येचे,उपस्थितीचे, नागरिकांच्या सहभागाचे, व्यवस्थेचे, आयोजनाचे विविध विक्रम स्थापित करणारे ठरले.

हिंदू जागृतीची चेतना
“हिंदू सारा एक” हे गीत कंठस्थ करण्याने हृदय आणि मनावर जो दृढ संस्कार करून गेला. पुढे १९९० च्या दशकात हिंदुजागृतीचे अभूतपूर्व पर्व देशाला अनुभवायला मिळाले. एका अर्थाने त्याचे समाजाला एकत्वाचा संदेश देणारे हे शिबीर होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या(rastriya swayamsevak sangh) आवाहनाला समाज भरभरून भरभरून व सक्रिय सहभाग नोंदवतो, असे आश्वासक वातावरण शिबिराने तयार केले. त्याची अनुभूती १९९० च्या दशकात झालेल्या हिंदू जागृतीच्या विविध कार्यक्रमांनी अनुभवण्यास मिळाली. आज देशात घडलेले सामाजिक परिवर्तन, हिंदू समाजाची जागृत झालेली वीरवृत्ती या सर्वांचा पाया १९२५ला घातला गेलेला असला तरी तळजाई शिबिरासारख्या महत्त्वपूर्ण व महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाने त्याच्या निश्चित व आश्वासक वाटचालीचे दर्शन संघटनेअंतर्गत व समाजाला दिशादर्शक असे होते.

अशा या भव्य शिबिरात तीन दिवस पूर्ण वेळ उपस्थित राहता आले हा एक मोठा ठेवा आहे.

दिलीप क्षीरसागर
नाशिक
पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार प्रमुख

Back to top button