HinduismNews

देवशयनी आषाढी एकादशी

पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती । रत्नकीळ फांकती प्रभा ।
अगणित लावण्य तेजः पुंजाळले । न वर्णवे तेथीची शोभा ॥

पांडुरंग नामाची,विठ्ठल भक्तीची एकतारी वाजवत पायी वारी करण्याचा क्रम अनेक शतकांचा असून, वारकरी आजही तितक्याच भक्तिभावाने या परंपरेचा वारसा पुढे नेत आहे. ही वारी म्हणजे पांडूरंगाच्या भक्तीचा अनुपम सोहळाच असतो. यातूनच समरसतेचा अर्थबोध होतो. आळंदी ते पंढरपूर वारी प्रारंभ झाली. तेव्हापासूनच या वारीत अठरापगड जातींमधून संत व समाजातील सर्व घटक सहभागी असून विठ्ठलभक्ती हीच सर्वांची ओळख आहे.

ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात, विठूनामाच्या गजरात अवघी पंढरी नगरी आज दुमदुमून गेली आहे. आषाढी एकादशी हा केवळ एक उत्सव नसून तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक ऐक्याचा महासोहळा आहे. शेकडो मैलांचा प्रवास पायी करत, ऊन-पावसाची परवा न करता, विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरी पंढरपूरला पोहोचले आहेत.

पंढरीची वारी ही केवळ पायांनी करायचा प्रवास नसून ती मनाला शुद्धी करणारी एक निरंतर प्रक्रिया आहे. डोक्यावरील तुळशीवृंदावन आणि मुखातील विठ्ठल नाम समस्त मानवी जीवनाला एक नवी दिशा प्रदान करतात.

॥ जय जय राम कृष्ण हरी ।।

Back to top button