NewsRSSकोकण प्रान्त

धर्म आणि राष्ट्र परस्परावलंबी, जगातील आव्हानांवर भारताच्या ज्ञानपरंपरेत मार्ग – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

‘ऑल इंडिया विहार सेवा ग्रुप’ च्या १४ व्या परिषदेचे मुंबईमध्ये आयोजन

“राष्ट्राचा उद्देश धर्म आहे आणि धर्मच राष्ट्राला टिकवून ठेवतो. धर्म आणि राष्ट्र हे परस्परांवर अवलंबून आहेत. एकाचे अस्तित्व असेल तरच दुसऱ्याचे अस्तित्व टिकू शकते,” असे प्रतिपादन सरसंघचालक प. पू. डॉ. मोहन जी भागवत यांनी केले. मुंबईतील बोरीवली येथे २ ऑक्टोबर रोजी आयोजित ‘ऑल इंडिया विहार सेवा ग्रुप’ च्या १४ व्या परिषदेत मोहन जी जैन तरुणांसह उपस्थितांना संबोधित करत होते. या प्रसंगी पद्मभूषण परम पूज्य आचार्य विजय रत्नसुंदरसूरि महाराज, आचार्य महाबोधी सूरीश्वरजी तसेच इतर आचार्य आणि मान्यवर उपस्थित होते.

आज जग विविध विरोधाभास, संघर्ष आणि टोकाच्या विचारसरणींमुळे अनेक आव्हानांना सामोरे जात आहे. या परिस्थितीत मानवतेला मार्गदर्शन करण्याची क्षमता भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेत आहे. त्यामुळे जग आज भारताकडे आशेने पाहत आहे, असे मोहन जी यांनी नमूद केले.

भारताने आपल्या ज्ञानाचा प्रसार कधीही अन्य देशांवर आक्रमण करून किंवा सक्तीने धर्मपरिवर्तन घडवून आणून केलेला नाही. उलट, मानवकल्याणाच्या निःस्वार्थ भावनेतून भारताने आपले ज्ञान जगाला दिले आहे. हीच भारताच्या ज्ञानपरंपरेची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे, असे ही त्यांनी सांगितले.

वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत आणि भगवद्गीता यांसह जैन आगम, त्रिपिटक आणि गुरुग्रंथ साहिब यांसारख्या महान ग्रंथांमध्ये मानवतेला दिशा देणारे व्यापक ज्ञान सामावलेले आहे. संतांच्या शिकवणुकीतूनही मानवकल्याण, समरसता आणि सेवाभावाचा संदेश मिळतो. या ज्ञानसंपदेची आज संपूर्ण जगाला आवश्यकता आहे, असे मोहन जी यांनी स्पष्ट केले.

भारताच्या या महान ज्ञानपरंपरेचे संरक्षण करणे आणि ती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही केवळ धार्मिक जबाबदारी नाही, तर संपूर्ण मानवतेप्रती असलेले कर्तव्य आहे. संतपरंपरा आणि सेवाभावी वृत्तीचे जतन म्हणजे मानवी समाजाच्या सुरक्षित आणि कल्याणकारी भविष्याचे जतन होय, असेही त्यांनी प्रतिपादन केले.

याप्रसंगी विहार सेवक आणि इतर उपस्थितांना संबोधित करताना पद्मभूषण परम पूज्य आचार्य श्रीमद् विजय रत्नसुंदरसूरि महाराजा म्हणाले की, “देशाची संस्कृती संपली तर देश संपायला वेळ लागत नाही. त्यामुळे देशाची संस्कृती वाचवणे आणि तिचे जतन करणे गरजेचे आहे आणि हे केवळ आपल्या संस्कारांमुळे शक्य होईल. राष्ट्र वाचले तर धर्म वाचेल आणि धर्म वाचला तर आपण सुरक्षित राहू.” तसेच राष्ट्र सुरक्षा, संस्कृती रक्षणासाठी आम्ही संघासोबत असल्याचे महाराजांनी अधोरेखित केले.

‘ऑल इंडिया विहार सेवा ग्रुप’ देशभरात पायी प्रवास करणाऱ्या जैन साधूंचा प्रवास सुरक्षित आणि अपघात विरहित होण्यासाठी मदत करतो. पद्मभूषण परम पूज्य आचार्य श्रीमद् विजय रत्नसुंदरसूरि महाराज यांनी आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत. आज यांच्या ‘अ’ नी आनंद यात्रा व अठराह कर्तव्य’ या ५३६ व्या पुस्तकाचे प्रकाशन मोहनजी भागवत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

Back to top button