संघ संस्थापक, कुशल संघटक, प्रभावी नेतृत्व, युगदृष्टा, युगप्रवर्तक असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक परमपूजनीय डॉक्टर हेडगेवारांचे प्रदीर्घ चिंतन, वेगवेगळे मार्ग चालून-बघून, शेवटी संघ मार्गावर अर्थात संघ कार्यपद्धतीवर येवून स्थिर झाले. स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरही भारतातील सर्व चिंता, प्रश्न व समस्यांवर एकमेव रामबाण उपाय म्हणजे संघाची एक तासाची शाखा. हे दिव्य साक्षात्कारी उपकरण – व्यायाम, उत्साह, शिस्त आणि संस्कार या चार मूलभूत पायांवर उभे असलेले “Man Making Machine” आहे. अशी ही “व्यक्ती निर्माणाची फॅक्टरी” डॉक्टरांच्या दिव्य चिंतनातून अवतरित झाली, प्रस्थापित झाली आणि निरंतर वर्धिष्णू होत राहिली.
येथे येणारा कच्चा माल कसाही असला तरी या फॅक्ट्रीतून संघाला अभिप्रेत असलेला श्रेष्ठ गुणांची – शक्तीची उपासना करणारा उत्तम नागरीकांचा पक्का माल बाहेर पडतो आणि समाजात जिथे जाईल तिथे राष्ट्रहित जपून उत्तमच काम करतो, अशी वर्षानुवर्षांची परंपरा आहे. अश्या प्रकारे शाखेद्वारे व्यक्ति निर्माणातून राष्ट्र निर्माण साध्य होते.
संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस म्हणतात, “समाजात विविध प्रकारचे परिवर्तन करणे, संघाला अभिप्रेत आहे, नित्य सिद्ध शक्तिरूपात समाजात संघ प्रतिष्ठित होऊ इच्छितो, हे दोन्ही पैलू लक्षात घेवून त्यानुरूप संपूर्ण कार्यपद्धतीची रचना केलेली आहे.”
संघाची शाखा ही एक अद्भुत अशी कार्यपद्धती आहे ज्यात आपण पवित्र भगव्या ध्वजाला नमन करतो, “भारत माता की जय” म्हणतो, “कौन जिता भाई कौन जिता?, संघ जिता भाई संघ जिता”, “वंदे मातरम्”, “हर हर महादेव”, या घोषणांनी सारा आसमंत दुमदुमून जातो आणि आपल्यातील आत्मविश्वास, उत्साह वाढतो, आयुष्यात जे करू ते उत्तमच करू याची ग्वाही एकमेकांसोबत दिली जाते आणि यातूनच सामान्य स्वयंसेवकाचा असामान्य कार्यकर्ता घडत जातो. एक तासाच्या शाखेत शारीरिक, बौद्धिक, व्यवस्था हे संघटनात्मक तर सेवा, संपर्क, प्रचार, वस्ती कार्य हे जागरणाचे कार्य विनासायास होत जाते.
प्रथम बंदीच्या काळात पूजनीय “श्रीगुरुजी” यांना अटक करण्यासाठी गेलेले असता, त्यांच्या खुमासदार अन् मिश्किल शैलीत उत्तर दिले की “अहो, संघातील सर्वोच्च पद हे “गटनायक” आहे! मी असाच फिरत असतो इकडे तिकडे, खरे काम करणारे तेच आहेत “
तर हा गटनायक ७-८ स्वयंसेवकांचे पालकत्व स्वीकारून, घरच्या सर्वांशी आत्मियतापूर्ण व्यवहाराने घनिष्ठ संबंध प्रस्थपित करतो, अडीअडचणीला दत्तासारखा उभा असतो, आजारी असल्यास सेवा – शुश्रुषा करतो, शाखेत न आल्यास विचारपूस करतो, दुःखाच्या क्षणी धीर देत असतो अन् आनंदाच्या क्षणी मागे उभा राहून त्यांच्या आनंदात मिसळून जातो.
गट पट रचना ही इतकी साधी सोपी रचना आहे की प्रत्यक्ष गृह संपर्कातून अर्ध्या एक तासात अफाट कार्यकर्त्यांची फौज उभी करण्याचे सामर्थ्य तयार होते, हीच आपली नित्य सिद्ध शक्ती!! म्हणूनच ही शक्तीची उपासना आहे आणि या उपासनेतूनच शक्ति प्राप्त होते.
एकदा भारत पाक युद्धात ब्लॅक आऊट असताना भारतीय सैन्याच्या काही विमानांना अचानक लँडिंग करायचे होते, आणि धावपट्टी खूप लांब होती. तत्कालीन द्वितीय सरसंघचालक पूजनीय श्रीगुरुजी यांना ही बातमी कळताच त्यांनी संघ शाखेच्या संपर्क रचनेतून अर्ध्या तासात किमान १०० जणांची फौज सैन्याने निश्चित केलेल्या स्थानी उभी केली. तो परिसर स्वच्छ करून, हातात मशाली घेऊन आपल्या सैन्याची बरीचशी विमाने व्यवस्थित लँड करून घेतली. त्यावेळच्या सैन्य प्रमुखांनी श्रीगुरुजींना विचारले इतक्या कमी वेळात जवळजवळ सैन्यासारख्याच शिस्तीत एवढी सगळी विविध क्षेत्रातील मंडळी कशी काय तयार केलीत, त्यावर पूजनीय श्रीगुरुजी एवढेच म्हणाले, “दररोजच्या एक तासाच्या शाखेतून!!”
संघाचे विद्यमान पूजनीय सरसंघचालक मा. डॉ. मोहनजी भागवत म्हणतात, “संघ शाखेला कोणताही पर्याय नाही, ते प्रासंगिक कार्य नाही, नित्य कार्य आहे, निरंतर चालणारे कार्य आहे. आम्ही अगोदरचे पाच सरसंघचालक, गेली १०० वर्ष याला पर्याय शोधण्याचा प्रयत्न करतोय, परंतु अजूनही संघाला अपेक्षित असा दुसरा एकही पर्याय मिळालेला नाहीये!!”
लेखक – सुहास पोतदार