NewsRSS

संघाचे शतक – सेवाभावाचा अखंड प्रवाह

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. या प्रवासात संघ एक मोठी सामाजिक शक्ती म्हणून पुढे आला आहे. ही सज्जनशक्ती, देशभक्ती आणि समाजहिताची शक्ती आहे. स्थापनेपासूनच संघाने व्यक्तिनिर्माणाला सर्वोच्च महत्त्व दिले. नागरिकांच्या मनात शुद्ध देशभक्तीचा भाव निर्माण झाला, तर अनेक सामाजिक समस्यांचे निराकरण होऊ शकते, हा संघाचा मूलभूत विचार आहे.

दैनिक शाखेतून स्वयंसेवकांच्या मनात प्रामाणिकपणे, निःस्वार्थ बुद्धीने आणि तन-मन-धनपूर्वक समाजासाठी कार्य करण्याची भावना रुजवली जाते. ‘हा समाज माझा आहे, मी या समाजाचा आहे आणि समाजाचे दुःख हे माझे दुःख आहे’, या आत्मीयतेतून स्वयंसेवक संकटाच्या वेळी मदतीसाठी तत्परतेने धावून जातात. भारतीय समाजातील स्वाभाविक सेवाभावाला संघाने संघटित आणि शिस्तबद्ध प्रयत्नांची जोड दिली.

सेवाभावाची भारतीय परंपरा

श्रीरामकृष्ण परमहंसांनी ‘दरिद्र नारायणाची सेवा करा’, असा संदेश दिला. त्यातून प्रेरणा घेऊन स्वामी विवेकानंद आणि स्वामी अखंडानंद यांनी सेवाकार्याला व्यापक दिशा दिली. सेवा ही केवळ कृती नसून समर्पणभावातून घडणारी आत्मीयतेची अभिव्यक्ती आहे. सातत्यपूर्ण सेवेतून हा भाव स्वभाव बनतो.खरी सेवा म्हणजे गरजूंचा अभाव दूर करण्याबरोबरच त्यांच्यात स्वावलंबन निर्माण करणे. ‘मी तुझ्यासोबत आहे; तू स्वयंपूर्ण हो’, हा आत्मविश्वास जागवणे हे सेवेचे साध्य असले पाहिजे. केवळ मदत करत राहण्याऐवजी व्यक्तीला सक्षम बनवणे महत्त्वाचे आहे.

भक्त पुंडलिकाने आई-वडिलांची सेवा करताना प्रत्यक्ष परमेश्वर दारी आला, तरी सेवा सोडली नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात—

‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले।
त्याचा होईन किंकर, झाडीन त्याचे अंगण।’

या परंपरेत सेवा हे कर्तव्य, भक्ती आणि समर्पण यांचे प्रतीक आहे.

संघ आणि सेवाकार्याचा विस्तार

डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा कलकत्त्यातील वास्तव्यादरम्यान रामकृष्ण मिशनच्या कार्याशी परिचय झाला. समाजासाठी कार्य करण्याच्या भावनेला संघटित दिशा देण्याची प्रेरणा त्यांच्या कार्यात दिसते. पुढे श्रीगुरुजींना स्वामी अखंडानंदांकडून यतीधर्माची दीक्षा मिळाली. या संस्कारांच्या पार्श्वभूमीवर संघाच्या व्यक्तिनिर्माणातून सेवाकार्याला व्यापक रूप मिळाले.

१९५२ मध्ये वनवासी कल्याण आश्रमाची स्थापना झाली. १९८९ मध्ये पूजनीय डॉ. हेडगेवार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त व्यापक सेवाकार्याचा संकल्प करण्यात आला आणि १९९१ पासून संघाच्या कार्यविभागांमध्ये सेवाविभाग सुरू झाला. शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन, सामाजिक समरसता तसेच ग्रामीण व वनवासी क्षेत्रांच्या विकासासाठी विविध सेवाप्रकल्प उभे राहिले.

स्वामी विवेकानंदांच्या जन्मशताब्दीनिमित्त कन्याकुमारी येथे त्यांच्या स्मारकाची उभारणी झाली. एकनाथजी रानडे यांनी तरुणांनी आयुष्यातील काही वर्षे राष्ट्रकार्यासाठी समर्पित करावीत, या भावनेतून ‘जीवनव्रती’ संकल्पना पुढे नेली. ईशान्य भारतासह देशाच्या विविध भागांत तरुणांनी सेवाकार्य उभे केले. ‘सारा देश माझा आहे आणि मी साऱ्या देशाचा आहे’, हा राष्ट्रीय एकात्मतेचा भाव दृढ झाला.

आज देशाच्या विविध भागांत संघप्रेरित सेवाकार्य शिक्षण, आरोग्य आणि स्वावलंबनासह अनेक क्षेत्रांत सुरू आहे. त्याचा उद्देश केवळ मदत करणे नसून समाजाशी आत्मीय संबंध निर्माण करणे आणि राष्ट्रीय एकात्मता बळकट करणे हा आहे.

आपत्तीच्या काळातील सेवाभाव

११ ऑगस्ट १९७९ रोजी गुजरातमधील मोर्वी येथे मच्छू धरण फुटून भीषण जलप्रलय झाला. त्या वेळी स्वयंसेवकांनी मदत व पुनर्वसनाचे कार्य केले. जून २०१३ मधील उत्तराखंड महापूर आणि केदारनाथ आपत्तीच्या काळातही संघ व संघप्रेरित संस्थांनी मदत केंद्रे उभारून बचाव, मदत आणि पुनर्वसन कार्यात सहभाग घेतला.

पूर, दुष्काळ, भूकंप किंवा अन्य संकटांच्या वेळी स्वयंसेवक परिस्थितीची गरज ओळखून मदतीला पुढे येतात. सेवाभाव स्वभाव बनल्यामुळे ते आदेशाची वाट पाहत नाहीत.

सेवाकार्याचे संस्थात्मक स्वरूप

विविध स्थानिक सेवा संस्थांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि क्षमता-विकास उपलब्ध करून देण्यासाठी २००३ मध्ये ‘राष्ट्रीय सेवा भारती’ या छत्रसंस्थेची सुरुवात झाली. स्थानिक संस्थांना सक्षम करून त्यांचे कार्य अधिक प्रभावी बनवणे, तसेच आपत्तीच्या वेळी तातडीने मदत उभी करणे, हे या व्यापक सेवाकार्याचे महत्त्वाचे पैलू आहेत.

सेवेचे संस्कार घरापासूनच होतात. दाराशी आलेल्या वासुदेवाला, वारकऱ्याला किंवा अन्य गरजूंना धान्य देण्याची शिकवण वडीलधारी मंडळी मुलांना देत असत. त्यामुळे सेवा ही भारतीय समाजाच्या संस्कारपरंपरेतील सहज गोष्ट आहे.

गेल्या शंभर वर्षांपासून संघाचे व्यक्तिनिर्माणाचे कार्य सातत्याने सुरू आहे. त्यातून निर्माण झालेला सेवाभाव समाजातील सज्जनशक्तीला एकत्र आणतो, आत्मीयता व समरसता वाढवतो आणि राष्ट्रजीवन सक्षम करतो.

‘देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखें।’

या ओळी समाजाने आणि राष्ट्राने आपल्याला दिलेल्या योगदानाची जाणीव करून देतात. स्वतःच्या सुखापलीकडे जाऊन समाजासाठी, राष्ट्रासाठी आणि मानवतेसाठी कार्य करण्याची प्रेरणा म्हणजे सेवाभाव. हा भाव स्वभाव बनला, तर जागृत, एकात्म, समरस आणि समर्थ समाजाची निर्मिती होईल. अशा समाजाच्या बळावर सक्षम, संपन्न आणि समृद्ध भारत घडवणे शक्य होईल.

लेखक:- श्रीपाद जोशी

Back to top button