HinduismNewsWorld

विश्वव्यापी श्री गजानन…

एकाक्षरं परं ब्रह्म सर्वभूतगुहाशयम् ।
विश्वरूपं जगन्नाथं गणेशं प्रणमाम्यहम् ॥ – मुद्गल पुराण

श्री गणेश हे केवळ एका विशिष्ट मूर्तीपुरते मर्यादित नसून साक्षात ‘ॐ’ कार स्वरूपातील परब्रह्म आहेत. विश्वातील प्रत्येक सजीव-निर्जीवाच्या अंतःकरणात चेतना रूपाने वास करणारे हे ‘सर्वभूतगुहाशयम्’ तत्त्व मानवाला स्वतःच्या आत डोकावण्याची प्रेरणा देते. हे संपूर्ण ब्रह्मांड ज्यांचे शरीर आहे अशा ‘विश्वरूप’ जगन्नाथाची आराधना करणे म्हणजे निसर्गाशी पर्यायाने सृष्टीतील प्रत्येक घटकाशी एकरूप होणे होय. जेव्हा आपण अशा विराट, सर्वव्यापी,अनंत शक्तीसमोर नतमस्तक होतो तेव्हा साहजिकच आपल्यातील अहंकाराचा नाश होऊन एका व्यापक वैश्विक जाणिवेचा जन्म होतो.. प्रस्तुत लेखात आपण श्रीगणेशाच्या याच विश्वव्यापी रूपाचा वेध घेणार आहोत.

श्री गणेश.. हे महाराष्ट्राचे लाडके दैवत. हिंदू धर्मात प्रत्येक शुभकार्याची सुरवात गणेशाच्या पूजनाने होते. संपूर्ण भारतात या परंपरेचे पालन वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. विशेषत: गणेश चतुर्थी तसेच माघ महिन्यातील गणेश जयंतीच्या दिवशी घरी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करून उत्सव साजरा करतात. भारतीय वंशाचे लोक जगभरात विखुरलेले आहेत. त्यामुळे जगभरात गणेशोत्सव साजरा होत असतानाची छायाचित्रे आपण अलीकडल्या काळात पाहिली असतील. मात्र, जगाच्या पाठीवर मुख्यत्वे दक्षिण आशियाई देशात गणपती तेथील संस्कृतीचा भाग आहे.

भारताबाहेरील गणपतींचा विचार करताना भारताबाहेरचा म्हणजे नक्की कुठला हे ठरवणे अत्यंत आवश्यक आहे. त्या आधी भारत कशाला म्हणायचे इथून सुरुवात करूया..

कपटी ब्रिटिशराज काळात भारतात आजच्या पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि श्रीलंका यांचा समावेश होता. त्या आधीच्या काळात, साधारण १७ व्या शतकात अफगाणिस्तान, तिबेट, नेपाळ, जावा, सुमात्रा, कंबोडिया, व्हिएतनाम या प्रांतालासुध्दा हिंदुस्थान अर्थात भारतच म्हटले जात असे. युरोपीय लोकांनी अफगाणिस्तानपासून व्हिएतनामपर्यंतच्या भागाला ‘ईस्ट इंडिया’ याच नावाने ओळखले. काही भाग वगळता हा संपूर्ण प्रांत युरोपीय देशांनी जिंकून घेतला व त्याला डच ईस्ट इंडिया, फ्रेंच ईस्ट इंडिया, ब्रिटिश ईस्ट इंडिया, पोर्तुगीज ईस्ट इंडिया अशी नावे दिली.

जेव्हा महाकाय भारत असा अस्ताव्यस्त पसरला होता, त्या ८ व्या शतकात आदि शंकराचार्यांनी पंचायतन पूजा पध्दती घालून दिली. पंचायतनमध्ये विष्णू, शिव, शक्ती, सूर्य आणि गणपती या पाच देवतांना एकत्र आणले गेले. यावरून ८ व्या शतकाच्या कितीतरी आधी गणपती लोकप्रिय देव होता, हे कळते. म्हणजे त्या वेळेपासूनच गणपतीबाप्पा ‘Top 5’ देवतांपैकी एक होता. आणखी एक लक्षात घ्याला हवे की, गणपती सर्वांचाच इतका लाडका होता की बौध्द आणि जैन धर्मांनीसुध्दा त्याला आपापल्या देवतांमध्ये स्थान दिले. बौध्द धर्म जेथे पसरला, तिथेसुध्दा गणपती पोहोचला. काही ठिकाणाचा गणपती हिंदूंनी तिथे नेला की बौध्दांनी हे कळत नाही. सार असे की गजाननाचे भक्त सर्वत्र पसरले होते. मग आजच्या अफगाणिस्तानमध्ये किंवा व्हिएतनाममध्ये गणपतीची मूर्ती किंवा गणपतीच्या उपासनेच्या खुणा मिळणे यामध्ये खरे तर काहीच आश्चर्य नाही.

श्री गणेशाय नमः ..

देवनागरी लिपीत लिहिलेले हे संस्कृत भाषेतील शब्द आहेत. कुठले? तर अझरबैजान येथील एका अग्नी मंदिराच्या शिलालेखाचे! अझरबैजानच्या बाकू शहराजवळ सूरखाणी नावाचे गाव आहे. या गावात अतेशगाह (अतेश अथर अथर्वन् अग्नी + गाह गृह) अर्थात ‘अग्निगृह’ नावाचे मंदिर आहे. या ठिकाणी नैसर्गिक वायूचे स्रोत असून शेकडो वर्षे जमिनीतून काही ज्वाला सतत पेटलेल्या असत. (आता ज्वाला तेवत ठेवण्यासाठी पाइपने गॅस आणला जात आहे.) या ज्वाळांच्या भोवतीने मंदिर उभे केले गेले होते व हिंदू, पारसी आणि शीख समुदायाचे लोक या ज्योतींची पूजा करत असत. अठराव्या शतकात तिथे राहणाऱ्या हिंदू व्यापाऱ्यांनी मंदिराचा जीर्णोध्दार केला/नवीन मंदिर बांधले. या मंदिरात कैक संस्कृत, दोन पंजाबी व एक पारसी भाषेतील शिलालेख आहे. संस्कृत शिलालेख गणेशवंदनेने सुरू होतो व लेखाची तारीख विक्रम संवत १८०२ , म्हणजेच इ.स. १७४५ सांगतो. एकोणिसाव्या शतकापर्यंत येथे हिंदू व शीख व्यापाऱ्यांची मोठी वसाहत होती. आता हे मंदिर एक जागतिक वारसा स्थळ आहे.

अफगाणिस्तानमधील महाविनायकाची मूर्ती

अझरबैजानमधून पूर्वेकडे निघालो की इराण ओलांडून आपण अफगाणिस्तानमध्ये येतो. अफगाणिस्तानमध्ये गणपतीच्या तीन संगमरवरी मूर्ती मिळाल्या आहेत. सकर दरा (जुने नाव – शंकर धारा) येथील मूर्ती दोन बुटुकल्या यक्षांच्या डोक्यावर हात ठेवून उभी आहे. गार्देझ येथील मूर्ती महाविनायकाची होती. ही मूर्ती खिंगल नावाच्या राजाने करवून घेतली होती, हे त्यावरील लेखावरून कळते. महाविनायकाची मूर्ती काबुलच्या संग्राहालयात होती. परंतु १९८० नंतर आलेल्या तालिबानी राजवटीत या संग्राहालयाची नासधूस केली गेली. त्यानंतर या मूर्तीचा ठावठिकाणा कळला नाही.जिहाद कशाला म्हणतात हे याचे सर्वोत्तम उदाहरण आहे.

मध्य आशिया..

दुसरीकडे हिमालयाच्या पर्वत शिखराच्या रांगेत चीन तुर्कस्तानच्या खोऱ्यात अल्ची छोट्याशा प्रांतातील गणपती नक्कीच लक्ष वेधून घेणारा आहे. या ठिकाणी गणेशाला अग्रपूजेचा मान दिला जातो. भव्य अशी ही गणेशमूर्ती मृगचर्मावर स्थापनापन्न झाली असून त्याच्या शेजारीही दोन मृग असतात. याचे वैशिष्ट्य म्हणजे या गणेशाची सोंड सरळ व समांतर रेषेत आहे.

चौथ्या किंवा पाचव्या शतकात इराणमध्ये गणेश पूजनाला सुरुवात झाल्याचे मानण्यात येते. उत्खन्नात सापडलेल्या एका थाळीवर येथील गणेशाची मूर्ती कोरलेली आहे. या ठिकाणी योद्धाच्या स्वरुपात ही मूर्ती कोरलेली आहे. गणेशाने डाव्या हातात सर्प, उजव्या हातात त्रिशूळ धारण केला आहे. मूर्तीचे कपडे इराण पद्धतीचे असून पर्शियन पद्धतीचा मुकुट डोक्यावर आहे.

रावळपिंडीचे गणेश मंदिर

अफगाणिस्तानमधून आणखी पूर्वेला पाकिस्तानमध्ये आलो की येथे अक्षरश: शेकडो हिंदू, बौध्द, जैन व शीख मंदिरे पाहायला मिळतात. कृष्ण मंदिर, राम मंदिर, शिव मंदिर, दुर्गा मंदिर, गुरुद्वारा, स्तूप, विहार यांची गणती नाही. आजमितीला सर्वच मंदिरांची आबाळ झाली आहे. स्वातंत्र्यानंतर कित्येक मंदिरे बंद आहेत. अथवा पाडली गेली आहेत.मंदिरांच्या भिंतींवर झाडे-वेली चढल्या आहेत. अशाच अवस्थेतील एक मंदिर आहे रावळपिंडीचे गणेश मंदिर. मंदिराच्या कळसावर बाहेरील बाजूस सिंहासनावर बसलेला, चतुर्भुज गणपती पाहायला आपल्याला आजदेखील पहायला मिळतो.

चीनमधला गणेश

चीनमध्ये दुनहुआंग येथे जवळजवळ ५०० गुंफा आहेत. यामधून बुध्दाची अतिशय सुंदर चित्र व शिल्प आहेत. यामध्ये एक गणेशाचे चित्र देखील आहे. चीनच्या पलीकडे मंगोलियामध्ये तिबेटमधून बौध्द धर्म गेला. तिबेटमध्ये भारतातून शेकडो बौध्द ग्रंथ पोहोचले होते. ते सर्व संस्कृत भाषेतील होते. तसेच काही संस्कृत ग्रंथांची चिनी भाषांतरे उपलब्ध होती. या सर्व संस्कृत व चिनी ग्रांथांची तिबेटी भाषांतरे केली गेली. या ग्रंथांच्या संचांना कांजूर व तांजूर असे म्हणतात. कांजूरमध्ये बुध्दाची वाक्ये आहेत, तर तांजूरमध्ये सूत्र, सूक्त, तत्त्वज्ञान, देवतावर्णन, प्रार्थना आदींचे ग्रंथ आहेत.तब्बल पाचव्या शतकाच्या प्रारंभापासून गणेशाची चीनमध्ये उपासना केल्याचे मानले जाते. ‘विनायक’ व ‘कात्रितेन’ असे दोन प्रकार चीनमध्ये दिसतात.

जपानमध्ये गणेशाची रूपे

चीनमधून गणेश जपानमध्ये पोहोचला आणि चीनपेक्षा जपानमध्ये अधिक लोकप्रिय झाला. जपानमध्ये विनायक-तेन आणि कांगी-तेन अशी गणेशाची दोन रूपे दिसतात. सातव्या-आठव्या शतकात जपानमध्ये आलेल्या गणपतीची पूजा आजही केली जाते. हा देव सुख देणारा आहे. त्याला ‘अवलोकितेश्वर’ असे सुध्दा म्हटले जाते. अवलोकितेश्वर हा सर्वांचे हित करणारा, संकटात मदत करणारा देव. आणखी एक विशेष असे की कांगीतेनला चक्क तळलेल्या मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो!

योकोहामा भागात गणपतीच्या मूर्ती कोरण्यात आल्याचे संशोधकांना आढळून आले. जपानमध्ये आजही २२ इंचापेक्षा मोठी मूर्ती आढळत नाही. तेथील काळ्या पाषाणावरील सोनेरी रंगातील गणपतीची कलाकृती टाकोआ मंडळातील ‘डिनगो-जी टोकासन’ येथे आहे. ‘काबो-डाई’ हा गणपति चतुर्भूज आहे. इतर न आढळणारी आयुधे त्याच्या हातात आहेत. उजव्या बाजूच्या हातात कुर्‍हाड, दुसर्‍या हातात कुंभ, डाव्या हातात धनुष्यबाण, तर एका हातात पुष्पमाळा, निळे डोळे, हसरा तोंडवळा, तसेच विद्वान पंडिताप्रमाणे असलेली शेंडी अशा प्रकारची श्री गणेशमूर्ती तेथील काही पुस्तकांवर विराजमान झालेली आहे. विद्येचा अधिपती असलेल्या गणपतीचे असे दर्शन जपानमध्ये घडते.

नेपाळ..

नेपाळमध्ये ८ व्या शतकापासून गणेशभक्ती केली जात आहे. सम्राट अशोकची कन्या चारुमती हिने गणेश मंदिर बांधले आहे. तेथील एका भुर्जपत्रावर ‘नमो भगवते आर्यगणपतीहृदयाय’, असे लिहिले आहे. काठमांडूपासून ८ मैल अंतरावर भाटगाव असून तेथे हे गणेश मंदिर आहे. नेपाळमध्ये गणपतीला ‘सूर्यविनायक’ असेही म्हणतात. विशेष बाब म्हणजे येथील सूर्यविनायक २ मूषकांवर बसलेला आहे.

श्रीलंका..

श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथून १५० मैलावर काटरगाव आहे. तेथील सुब्रह्मण्यम् मंदिरात गणपतीचे दर्शन घडते. श्रीलंकेत गणपति ‘पिल्लाईयार’ किंवा ‘गणदेंवियो’ या नावाने प्रसिद्ध आहे. वर्ष १०७० ते १११८ पासून येथे गणपति आढळून आले.

म्यानमार..

ब्रह्मदेशातील म्हणजे आताच्या म्यानमारमध्ये ६ व्या शतकापासून गणेशभक्ती केली जाते. म्यानमारमध्ये वर्ष १०४४ ते १०७७ या काळात गणपति आढळून आले. तेथे काही ठिकाणी नोव्हेंबरमध्ये पीकपाणी आल्यावरही गणपतीचा उत्सव केला जातो.

इटली…

रोममध्ये श्री गणेश ‘गुरु’ म्हणून ओळखला जातो. वर्ष ७९१ मध्ये लॅटिन भाषेत Venetian Manuscripts पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यात गणपतीचा उल्लेख ‘विद्येचा स्वामी’ असाच करण्यात आला आहे. रोममध्ये श्री गणेशमूर्तीचा तोंडवळा एकूण मूर्तीच्या आकाराच्या मानाने मोठा आहे. गणपतीच्या डाव्या कानावर शिवप्रतिमा आणि त्रिशूल असून कानही पुष्कळ मोठे वाटतात. मूर्तीची उंची, डोक्याचा प्रकार आणि भव्यता रोमन पद्धतीची जाणीव करून देतो. ही श्री गणेशमूर्ती दुर्मिळ म्हणून ओळखली जाते.

मेक्सिको..

मेक्सिकोतील कोपानच्या मंदिरामध्ये श्री गणेशमूर्ती आहे. ती द्विभुज असून तिच्या दोन्ही हातात विजेचे प्रतीक म्हणून प्रकाशनळ्या आहेत.

पूर्व आशिया..

बँकॉक ही थायलंडची राजधानी असून तेथील महापालिकेचे बोधचिन्ह गणपतीचे आहे. तेथील जागतिक व्यापार केंद्रामध्ये अनेक श्री गणेशमूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. थायलंडच्या शासकीय कला विभागाच्या मुद्रेवर 64 कलांची देवता असलेला गणेश आहे. हा विभाग चित्र, शिल्प, नृत्य, नाटक, गायन, वादन, सांस्कृतिक वारसा आदींचा विकास करण्यासाठी प्रतिबद्ध असतो.

सिंगापूर येथे विनायकाचे मंदिर आहे. मलेशियात श्री गणेश गुफा आहेत. कुआलालंपूर, रुदाकन आणि कलंग भागात सिद्धिविनायकाची मंदिरे आहेत. ब्रुनोई येथील गणपती ‘महाबिनी’ या नावाने ओळखला जातो. व्हिएतनामच्या शहरांमध्ये अनेक ठिकाणी गणपती दिसतात. तेथील सयामी पुस्तकांमध्ये गणपतीची छायाचित्रे आढळतात. तेथील गणपति कासवावर बसलेला आढळून येतो.

इंडोनेशिया..

इंडोनेशियात २० सहस्रच्या नोटेवर ९ व्या शतकात गणपतीचे छायाचित्र आढळून आले असून ते येथील संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. जावा येथे गणपति ‘कलांतक’ या नावाने ओळखला जातो. वर्ष १२३९ पासून तेथे श्री गणेश मंदिरे बांधली जात आहेत. कंबोडियात वर्ष ८९९ ते ९०० च्या काळात श्री गणेशमूर्ती सापडल्या. सुमात्रा येथे ७ व्या ते १३ व्या शतकापासून श्री गणेशमूर्ती आढळून आल्या आहेत.तसेच इंडोनेशियाने ‘शिक्षण’ या विषयावर जेव्हा नवीन नोट काढली, तेव्हा त्यावर बुध्दिदाता गणपतीचे चित्र छापले.इस्लामपंथीय इंडोनेशिया नोटेवर गणपतीचे चित्र छापते, तर हिंदु देवता पुजल्या जाणार्‍या भारतात तसे का होऊ शकत नाही ?

बलुचिस्थान

बलुचिस्थान.. पाकिस्तान अन् इराण यांत विभाजित झालेला हा भाग. येथे मिळालेली गणेशमूर्ती बलुची पेहरावात आहे. श्री गणेशमूर्तीच्या मस्तकावर बलुची पगडी आहे आणि त्यांच्या आसपासच्या स्त्रिया पारंपरिक बलुची पेहरावात गणेशाची आरती करतांना दिसत आहेत.

तुर्कीये..

तुर्कस्तानच्या अंकारा शहरानजीक झालेल्या उत्खननात सापडलेल्या मूर्तींतील श्री गणेशमूर्ती लुंगी लावून बसलेली आणि डोक्यावर गोंडेदार तुर्की टोपी असलेल्या तुर्की पेहरावात आहे.

उजबेकिस्तान..

ताश्कंद येथील मंदिरात आजही श्री गणेशमूर्तींचे अवशेष आढळतात. येथे शिव मंदिरे मोठ्या प्रमाणावर असली, तरी तेथे शिव-पार्वतीसह श्री गणेशमूर्तीही दिसतात.

विविध देशांतील गणेशाच्या मूर्ती, मंदिरे, ग्रंथ व चिन्हे आपण पाहिली. ही गणेशाच्या उपासनेचे अगदी छोटीशी झलक मात्र आहे. एक मूर्ती सापडण्याच्या अवतीभोवती खूप काही येते. मूर्ती आहे त्या अर्थी मंदिर होते, मंदिर बांधणारे इंजिनियर्स होते, मंदिरांवर प्रचंड खर्च करणारे राजे, श्रेष्ठी होते, पूजाअर्चा करणारे पुजारी होते. त्या देवाचे गुणगान करणारे साहित्य लिहिले गेले होते. त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारे संत होते.

मंदिरात राहणारे साधक होते. मंदिरात नित्य चालणारे – पूजा, आरती, प्रसाद, भजन, कीर्तन, उपासना असे कार्यक्रम होते, तसेच नैमित्तिक कार्यक्रम – वार्षिक मेळा, वारी, परिक्रमा, जत्रा, उत्सव, मिरवणूक, यज्ञ-याग, होम-हवन असेही काही कार्यक्रम होते. याशिवाय मंदिरात चालणारे इतर कार्यक्रम – उदा., कीर्तन, प्रवचन, पुराणकथन चालत असणार. गायन, वादन, नृत्य व नाटकाचे खेळसुध्दा मंदिरात होत असणार. लग्न-मुंजीसारखे कार्यक्रम होत असणार. मंदिराला एखादे गाव किंवा जमीन लावून दिलेली असणार. हार-फुले, दिवाबत्ती, देवाचे कपडे, दूध-फळे, धूप-वाती, अभिषेकाचे समान… असे अनेक गोष्टींचे कंत्राट ठरावीक कुटुंबांना दिलेले असणार. एक मंदिरावर कितीतरी कुटुंबे, नट, कलाकार, कीर्तनकार, पुजारी यांच्या अनेक पिढयांची उपजीविका चालली असणार. पर्यायाने भारतीय संस्कृती या प्रदेशात शतकानुशतके असणार.. कालौघात म्हणा अथवा छद्मी ख्रिश्चनांच्या, जिहादी मुसलमानांच्या क्रूर आक्रमणामुळे म्हणा आज परिस्थिती वेगळी असली तरी इतिहास हा कधीही बदलता येत नाही..

गणपती भारतात पूजले जाणारे दैवत. परंतु, संपूर्ण हिंदू समाजाला जोडणारे जे समान सांस्कृतिक धागे आहेत त्यापैकीच एक गणपतीदेखील आहे. तसेच हिंदू संस्कृतीचा प्रभाव ज्या-ज्या भागात होता त्या प्रत्येक ठिकाणी गणपतीचे पुरातत्त्वीय अस्तित्व आपल्याला जरूर आढळते. भौगोलिक वैविध्यतेनुसार गणपतीची रूपे बदलत जातात. प्रत्येक परंपरेतील गणपतीचा स्वतंत्र आविष्कार आहे. त्यामुळे गणपतीचे आढळणारे अवशेष म्हणजे हिंदू आक्रमणाचे प्रमाण ठरत नाहीत. त्याउलट हिंदू संस्कृतीच्या वैविध्यपूर्ण एकतेचे ते सबळ पुरावे आहेत. त्यामागील कथा, पूजा-पद्धतीत त्या-त्या ठिकाणच्या स्थानिक स्वत्वाची जाणीव आहे.

वेगवेगळ्या स्वरूपातील गणपती म्हणजे सहिष्णुता, उदारमतवाद आणि स्वातंत्र्याचे दाखले आहेत. अशा सांस्कृतिक मूल्यांनी विणलेला हिंदू समाज इतक्या भीषण आक्रमणांमुळे देखील नामशेष होऊ शकला नाही. कारण, त्यात प्रत्येक हिंदू हा स्वतंत्रपणे धर्माचा उद्गाता, अधिकारी ठरतो. म्हणून शेवटचा हिंदू जीवंत असेपर्यंत हिंदुत्व कालबाह्य होणार नाही. म्हणून समाजाच्या बांधणीसाठी या समान धाग्यांना अधिक मजबूत करणे काळाची गरज आहे.

विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लम्बोदराय सकलाय जगद्धिताय ।
नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते ॥

संदर्भ :-

  • श्री गणेश पुराण
  • श्री मुद्गल पुराण
  • काबुल महाविनायक – आनंद कानिटकर
  • ९९ थॉट्स ऑन गणेशा – देवदत्त पट्टनाईक
    https://maharashtratimes.com/ganesh-festival/ganapati-stories/ganesh-vishwaroop/articleshow/22286845.cms
    https://psiddharam.blogspot.com/2008/08/blog-post_3938.html?m=0
    https://www.mahamtb.com/Encyc/2020/8/21/article-on-Global-Ganesha.html#/google_vignette
    https://www.evivek.com/Encyc/2019/8/31/The-biggest-Ganesha-temple-in-the-world.html
    https://www.sanatan.org/mr/a/89417.html
    https://bobhata.com/lifestyle/10-lord-ganesh-temples-around-world-1320
    https://marathichowkvishesh.com/ganpati-temple-in-across-world-information-in-marathi/
Back to top button